नोव्हेंबर २०२४ मध्ये एका ५० वर्षीय महिलेचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी मंगळवारी बंगळुरू पोलिसांनी ३० वर्षीय इलेक्ट्रिशियनला अटक केली. आरोपीने सदर महिलेच्या घरातून चार लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिण्यांची चोरी केली आणि नंतर महिलेचा खून केला. आरोपी लक्ष्मण हा येलहंका येथील केएचबी कॉलनी क्वार्टर्स झोपडपट्टीत राहतो. तर मृत डी. मेरी त्याच परिसरात राहत होती. कन्नड चित्रपट दृश्य पासून प्रेरित होऊन योजनाबद्धरित्या सदर महिलेचा खून करत पुरावे नष्ट केले असल्याचे आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितले.

आरोपी लक्ष्मणने नोव्हेंबर महिन्यात डी. मेरीचा खून करत तिच्या मोबाइलचे सीम कार्ड कचरा डेपोत फेकले होते. तर तिचा मृतदेह डम्पिंग ग्राऊंडमध्ये लपवला होता. तसेच सीम कार्ड काढून मेरीचा मोबाईल एका ट्रकमध्ये लपवला. यामुळे पोलिसांना मेरीचा पत्ता लगात नव्हता. मेरीच्या भाचीने २७ नोव्हेंबर रोजी मेरी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. तेव्हापासून पोलीस मेरीचा शोध घेत होते.

कोणताही ठोस पुरावा हाती लागत नसल्यामुळे पोलिसांनी मेरीच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डची तपासणी केली. मोबाइल टॉवरच्या मदतीने पोलिसांनी लक्ष्मणचा नंबर मिळवला. लक्ष्मणही त्याच परिसरात राहत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र तोही नोव्हेंबर महिन्यापासून बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला.

पोलिसांनी लक्ष्मणच्या सीडीआरची तपासणी केली असता त्याचे दोन महिलांशी विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली. यानंतर महिला पोलिसांनी साध्या वेषात त्याच्या दोन्ही प्रेयसींशी ओळख वाढवली आणि लक्ष्मण बद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. ९ मार्च रोजी दोघींपैकी एका प्रेयसीला तो भेटायला येणार असल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता लक्ष्मणने आपला गुन्हा मान्य केला.

खून करून पुरावे कसे नष्ट केले?

लक्ष्मणने पोलिसांना सांगितले की, तो इलेक्ट्रिशियनचे काम करतो, तसेच फावल्या वेळात रिक्षाही चालवतो. त्याने काही दिवसांपूर्वी चिकनचे दुकान उघडले होते. मात्र या व्यवसायात त्याला १२ लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे कर्जदारांचे पैसे देण्यासाठी त्याने सदर गुन्हा केला. परिसरात इलेक्ट्रिशियनचे काम करत असताना त्याला मेरी यांच्याकडे दागिने असल्याचे कळले होते. त्यामुळेच त्याने मेरी यांचा खून करत तिचे दागिने चोरण्याचा निर्णय घेतला.

लक्ष्मणने मेरी यांच्या घरातील विजेचे कनेक्शन तोडले. त्यानंतर वीज दुरूस्त करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात प्रवेश केला आणि ओढणीने गळा दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह गोणीत भरला. एका रिक्षाचालक नातेवाईकाला कचरा फेकण्याच्या बहाण्याने रिक्षा मागून सदर गोणी डम्पिंग ग्राऊंडमध्ये फेकली. या माहितीनंतर पोलिसांनी डम्पिंग ग्राऊंडमधून मेरी यांचा मृतदेहाचा सापळा शोधून काढला आहे.