केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाची सुरुवात करत मुलींना प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटता यावा, यासाठी शालेय स्तरापासून विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटामाटात या अभियानाची घोषणा केली होती. मात्र गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात एक असा गुन्हा घडला, ज्यामुळे या अभियानासह शिक्षण क्षेत्रालाही काळिमा फासला गेला.
दहावीतील विद्यार्थीनीने २६ जानेवारी रोजी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या विषयावर शाळेत भाषण दिले. मात्र काही दिवसातच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. अत्याचार करणारा दुसरा तिसरा कुणी नसून पीडित मुलीच्या शाळेतील शिक्षक आहे. अत्याचाराची घटना घडल्यानंतरही सदर विद्यार्थीनीने आपली स्वप्न पूर्ण करण्याचा चंग बांधला असून मोठ्या धाडसाने ती बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करत आहे.
नेमके प्रकरण काय?
२६ जानेवारी रोजी पीडित विद्यार्थीनीने शाळेत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या विषयावर भाषण देताना मुली वाचविण्याची गरज आणि त्यांना शिक्षण देणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले. या भाषणानंतर तिचे सगळीकडे कौतुक होत होते. मात्र ७ फेब्रुवारी रोजी या शाळेतील ३३ वर्षीय नराधम शिक्षकाने वाढदिवस साजरा करण्याचे आमिष दाखवून पीडितेला हॉटेलवर बोलावले आणि तिथे बोर्डाच्या परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. तक्रारीनंतर या नराधम शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
२७ फेब्रुवारी पासून विद्यार्थीनीची दहावीची परीक्षा सुरू होत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने पीडितेशी संवाद साधला. त्यात ती म्हणाली, “मी पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. विज्ञान आणि गणित हे माझे आवडते विषय आहेत. मी बोर्डाचा निकाल पाहून माझे क्षेत्र निवडेन.” ७ फेब्रुवारीला अत्याचाराची घटना घडल्यापासून पीडित मुलगी आत्याच्या घरी राहण्यासाठी गेली आहे. तिच्या काकांनी सांगितले की, गावातले लोक आणि नातेवाईक रोज घरी येऊन विचारपूस करत राहिले, तर आमच्या मुलीचा अभ्यास होणार नाही, त्यासाठी तिला इथे ठेवून घेतले.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले की, ती एक चांगली विद्यार्थी असून अभ्यास आणि शिस्तीच्या बाबतीत ती अतिशय काटेकोर आहे. २६ जानेवारी रोजी तिने अतिशय अभ्यासपूर्ण असे भाषण दिले होते. आज या आव्हानात्मक परिस्थितीही ती ज्या प्रकारे संघर्ष करत आहे, तो सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.