एपी, लंडन
१६ वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी नसल्यास इन्स्टाग्रामवर आता थेट प्रक्षेपण (लाइव्हस्ट्रीम) करता येणार नाही. तसेच नग्नतेशी संबंधित ‘कंटेंट’ त्यांना पालकांच्या परवानगीशिवाय पाहता किंवा पाठवताही येणार नाहीत.
फेसबुक, इन्स्टाग्रामची कंपनी असलेल्या ‘मेटा’ने १८ वर्षांखालील वापरकर्त्यांची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याच्या हेतूने हे बदल केले आहेत. सध्या अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया येथे हे बदल लागू करण्यात आले असून काही महिन्यांत ते जगभर अमलात येणार आहेत.
फेसबुक, इन्स्टाग्रामवर किशोरवयीन वापरकर्त्यांची फसवणूक होण्याचे त्यांच्याशी लैंगिक गैरवर्तन करण्याच्या घटना वाढीस लागल्यानंतर या वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी त्यांच्या खात्यांसाठी सप्टेंबर महिन्यात विशेष सुविधा सुरू केली. या सुविधेद्वारे या किशोरवयीनांच्या ऑनलाइन वापरावर पालकांना अधिक नियंत्रण ठेवता येते. त्यात भर म्हणून आता या वापरकर्त्यांकडून ‘लाइव्ह स्ट्रीम’ करण्यावरही निर्बंध येणार आहेत. अनेकदा ऑनलाइन चॅटिंग किंवा प्रलोभनांना बळी पडून किशोरवयीन मुलेेमुली लैंगिक छळवणुकीच्या शिकार बनतात. यात ‘लाइव्ह व्हिडिओ’चा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यातून सुटका करण्यासाठीच ‘मेटा’ने नवीन नियम लागू केले आहेत. या बदलांनुसार, १६ वर्षांखालील किशोरवयीन वापरकर्त्यांना इन्स्टाग्रामवर ‘लाइव्ह’ येण्यासाठी पालकांची परवानगी लागेल. तसेच, इन्स्टाग्राम खात्यावरून पाठवण्यात येणाऱ्या आक्षेपार्ह चित्रे पाहण्याचा पर्याय त्यांना खुला करता येणार नाही, असे ‘मेटा’ने आपल्या म्हटले आहे.
या सुरक्षात्मक उपाययोजनांचा समावेश
- समाजमाध्यम खाते खासगी ठेवणे, अनोळखी लोकांकडून येणारे संदेश ‘ब्लॉक’ करणे, हाणामारीसारखी संवेदनशील असलेली दृश्ये मर्यादित करणे, ६० मिनिटांनंतर अॅप बंद करण्याची आठवण करून देणे आणि रात्रीच्या वेळेस ‘नोटिफिकेशन्स’ थांबवणे.
- फेसबुक व मेसेंजरवरील किशोरवयीन खाती देखील अशाच प्रकारचे स्वयंचलितपणे संरक्षित करण्यात येतील, जे अनुचित व अनावश्यक संदेशाचा भाग टाळतील, तसेच किशोरवयीनांचा वेळ योग्यरीत्या वापरला जात आहे याची खात्री करतील. सप्टेंबरपासून या नियोजनाद्वारे किमान ५४ दशलक्ष किशोरवयीन खाती तयार करण्यात आली आहेत, असे ‘मेटा’ने सांगितले.