अफगाणिस्तान सोडण्यासाठी मंगळवारच्या अमेरिकेच्या अंतिम मुदतीपूर्वी तालिबान्यांपासून आपला बचाव करण्यासाठी बाहेर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या डझनभर अफगाणी नागरिकांना अनपेक्षित मार्गाने मदत मिळाली आहे. ही मदत करणारी व्यक्त आहे. इन्टाग्राम इन्फ्ल्यूएन्सर क्वेन्टिन क्वारंटीनो. क्वॉरंटिनो हे खरंतर न्यूयॉर्क शहरातील २५ वर्षीय टॉमी मार्कस याचं इन्टाग्राम अकाऊंटवरचं नाव आहे. तो आपल्या लिबरल मिम्स आणि करोना लसीकरणाच्या विरोधकांवरच्या विनोदांसाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे आता क्वॉरंटिनो अर्थात मार्कसने आपल्या फॉलोअर्सच्या मदतीने शक्य तितक्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये बचाव मोहीम सुरू केली आहे.
फॉलोअर्सच्या मदतीने आर्थिक सहाय्य उभारत मोहीम सुरु
मार्कसने त्याच्या फॉलोअर्सच्या मदतीने काही दिवसात ‘गो फंड मी’ वर ७० लाख अमेरिकन डॉलर्स इतकं आर्थिक सहाय्य उभारलं आणि त्याच्या मदतीने तालिबानच्या धमक्यांना तोंड देत असलेल्या जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. बुधवारी त्याच्या ऑपरेशन ‘फ्लायअवे’ने GoFundMe मोहिमेद्वारे आर्थिक पुरवठा केलेल्या खाजगी चार्टर्ड विमानातून ५१ लोकांना अफगाणिस्तानातून युगांडाला जाण्यास मदत केली. मार्कसने आपल्या ८,३२,००० फॉलोअर्सना आवाहन केल्यानंतर १,२१,००० हून अधिक लोकांनी या मोहिमेसाठी देणगी दिली होती. हा GoFundMe च्या इतिहासात उभारला गेलेला सर्वात मोठा मानवतावादी निधी ठरला आहे.
View this post on Instagram
ते आत्ता अफगाणिस्तानातच राहिले तर…
मार्कसने असोसिएटेड प्रेसला सांगितले की, “ते माझ्यावर विश्वास ठेवत आहेत ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ते माझा विश्वास असलेल्या ठिकाणी इतकी लक्षणीय रक्कम देण्यास तयार आहेत.” मार्कस म्हणाला, “चमत्कारिक व्यतिरिक्त कोणता शब्द वापरावा हे मला माहित नाही. कारण यामुळे मानवतेवरील विश्वास दृढ झाला आहे.” तसंच मार्कसने यावेळी असंही सांगितलं कि, “आम्ही या परिस्थितीत राजकीय विभाजनाला बाजूला सारत सर्व स्तरातून एकत्र येऊन या लोकांना वाचवलं आहे. कारण, जर ते आत्ता अफगाणिस्तानात राहिले तर त्यांचं भविष्य काय आहे हे आपल्याला माहित आहे आणि ते त्यांच्यासाठी निश्चितच योग्य नाही.”
मार्कस म्हणाला कि, ज्या लोकांना बाहेर काढण्यात आलं त्यात महिला, लहान मुलं, मानवतावादी कार्यकर्ते आणि अनेक इतर जण होते. ते बर्याच काळापासून अफगाणिस्तानच्या भल्यासाठी लढत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयदेखील आहेत. आयोजकांनी सांगितलं होतं कि, ते ३०० लोकांना त्यांच्या कुटुंबियांसह वाचविण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण, ह्या लोकांना तालिबानकडून फाशी दिली जाण्याचा धोका आहे.