मागील काही काळापासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. येथील जनता एक वेळच्या जेवणासाठी मोताद झाली आहे. पाकिस्तानमधील सामन्य नागरिकांचा दररोज जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. देशातील अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकारना परदेशांसमोर हात पसरावे लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील कट्टरपंथीय संघटनेच्या नेत्याने पाकिस्तान सरकारला अजब सल्ला दिला आहे.
पाकिस्तानने जगातील विविध देशांसमोर भीकेसाठी हात पसरण्याऐवजी एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात अणुबॉम्ब घेऊन जगाला धमकावलं पाहिजे. असं केल्याने संपूर्ण जग पाकिस्तानच्या मागण्या मान्य करेल, असा सल्ला पाकिस्तानमधील कट्टरपंथी गट तेहरीक-ए-लबाइकचे नेते अमीर हाफिज साद हुसेन रिझवी याने पाकिस्तान सरकारला दिला आहे. रिझवी याने जाहीर भाषणातून हा सल्ला दिला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.
हेही वाचा- भारताच्या अर्थसंकल्पावर तालिबान झाला खूश; नेमकं कारण काय?
संबंधित व्हिडीओत रिझवी म्हणाले, “अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी लष्कर प्रमुखांना समोर करून पाकिस्तान सरकार जगभरात सगळीकडे भीक मागत आहे. कुणी भीक घालतंय, तर कुणी भीक देत नाहीये. काही देश स्वत:चा फायदा बघत आहेत. पण तुम्ही जगाकडे भीक मागण्यासाठी का जात आहात? पाकिस्तान सरकार आणि लष्कराने उजव्या हातात कुराण आणि डाव्या हातात अणुबॉम्बचा बॉक्स घेऊन जगाला धमकावलं पाहिजे. त्यानंतर संपूर्ण जग तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील.”