नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा ‘बालकबुद्धी’ असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसने अख्ख्या हिंदू समाजाचा अपमान केला असून देश कधीही माफ करणार नाही, असे ठणकावतानाच काँग्रेस देशात अराजक माजवत असून जनतेने काँग्रेसच्या खोटेपणापासून आणि षड्यंत्रांपासून सावध राहिले पाहिजे, असा इशारा मोदींनी दिला.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी मोदी व भाजपच्या धोरणांचे वाभाडे काढले होते.
राहुल गांधींच्या प्रत्येक मुद्द्याला मोदींनी सव्वादोन तासांच्या भाषणामध्ये तितकेच कडवे प्रत्युत्तर दिले. ‘काँग्रेसच्या देशविरोधी कारस्थानांना मोदी घाबरत नाही, माझे सरकारही घाबरत नाही. ‘विकसीत भारता’चा संकल्प आम्ही पूर्ण करू. २०१४ आणि २०१९ मध्ये विरोधकांनी मला आत्ता इतकाच विरोध केला होता. पण, माझी उमेद, माझा आवाज तितकाच बुलंद झालेला आहे’, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेससह विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या लोकसभेतील वाढलेल्या ताकदीलाच आव्हान दिले.
‘काँग्रेसने माजवलेल्या कोलाहलामध्ये सत्याचा आवाज कधीही दबून जाणार नाही. खोटेपणाला मुळे नसतात, हा खोटेपणा टिकणार नाही. लोकसभेमध्ये मला सत्याची ताकद पाहायला मिळाली, त्याचा मला आनंद होत आहे’, असे म्हणत मोदींनी राहुल गांधींना अप्रत्यक्ष टोला दिला. राहुल गांधींच्या भाषणातील काही भाग कामकाजातून काढून टाकल्यानंतर, मोदींच्या जगात सत्य लपू शकते पण, वास्तव जगात सत्याचा आवाज कधीही दबून राहणार नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली होता.
२०२४ मधील काँग्रेस पक्ष ‘परजीवी काँग्रेस’ म्हणून ओळखला जाईल, अशी टीका मोदींनी केली. मित्र पक्षांना संपवून काँग्रेस टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपविरोधातील थेट लढाई काँग्रेसचे जिंकणारे प्रमाण (स्ट्राइक रेट) फक्त २६ टक्के होते. मित्र पक्षांची मदत मिळाली तिथे हे प्रमाण ५० टक्क्यांवर गेले. काँग्रेसला मिळालेल्या ९९ जागा मित्र पक्षांच्या मदतीनेच मिळाल्या आहेत, असे मोदी म्हणाले.
जनतेने सावध रहावे
काँग्रेस देशात अराजक परसवत असून जनतेने सावध राहिले पाहिजे. कधी दक्षिण विरुद्ध उत्तर तर, कधी भाषांच्या मुद्द्यांवरून फूट पाडली जात आहे. काँग्रेस लोकांना जाती-जातींमध्ये लढवत आहे. लोकांमध्ये वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात असून आर्थिक अराजकही माजवण्याचे कटकारस्थान काँग्रेस करत आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये घेतले जाणारे आर्थिक निर्णय देशावर आर्थिक ओझे बनेल. तसा जाणीपूर्वक खेळ काँग्रेस खेळत आहे. काँग्रेसने ‘सीएए’वरून अराजक माजवले. दंगली भडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप मोदींनी केला.
काँग्रेसने संसदेच्या अधिवेशनामध्ये देखील ‘संविधान बचाव’चा नारा दिला असून राहुल गांधींनीही भाषणामध्ये भाजप संविधानविरोधी असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना मोदींनी काँग्रेसच संविधानविरोधी, दलित-ओबीसी आणि आरक्षणविरोधी असल्याचा दावा केला. ‘संविधान डोक्यावर घेऊन इथे नाचणाऱ्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये संविधान लागू करण्याची हिंमत दाखवली नाही. त्यांनी अनुच्छेद ३७०ची तरफदारी केली. आम्ही सत्तेवर ल्यावर ३७० रद्द केले, तिथे संविधान लागू केले. तिथल्या जनतेला हक्क मिळवून दिला. ३७०ची भिंत पाडली, दगडफेक बंद पडली, तिथे लोकशाही मजबूत झाली, तिथल्या जनतेचा लोकशाहीवरील विश्वासही वाढला, असे मोदी म्हणाले.
काँग्रेसचा तिसरा पराभव
गेल्या तीन निवडणुकीत काँग्रेसला शंभर जागादेखील मिळवता आलेल्या नाहीत. काँग्रेसचा हा तिसरा मोठा पराभव आहे. खरेतर काँग्रेसने आत्मपरिक्षण केले पाहिजे. काँग्रेसने विकासामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या प्रत्येक षडयंत्रांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. देशविरोधी कारस्थान आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही मोदींनी दिला.
सभागृहात गोंधळ
मोदींचे भाषण सुरू असताना काँग्रेसह ‘इंडिया’ आघाडीतील सर्व घटक पक्षांनी सभागृहात मोदीविरोधी घोषणाबाजी करून गोंधळ माजवला. या गोँधळातच मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर दिले. विरोधकांनी मोदींची हुर्ये उडवली. मोदींनी भाषणात मणिपूरचा उल्लेख केला नाही. त्याबद्दल मणिपूर- मणिपूर, तानाशाही नही चलेगी, जस्टिस फॉर मणिपूर, जय संविधान अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. मोदींच्या भाषणातील मुद्द्यावर जोरदार टाळ्या सत्ताधारी बाकांवरील सदस्य विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते. मोदींनी भाषणादरम्यान तीन-चार वेळा पाणी पिण्यासाठी क्षणभर थांबले. एकदा तर मोदींनी घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. पण, नम्रतेने टागोरांनी तो नाकारला! विरोधक तब्बल दोन तास न थकता घोषणाबाजी करत होते. लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांनी आसनावर बसण्याची विनंती फेटाळून लावली.
काँग्रेस दलितविरोधी
काँग्रेसने संविधानाचे रक्षणकर्ता असल्याचाही खोटेपणा केला आहे. आणीबाणी लादून क्रुरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. दलित, ओबीसींवर अन्याय केला. काँग्रेसच्या दलित विरोधी धोरणांमुळेच डॉ. आंबेडकरांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. डॉ. आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत केले गेले, त्यांचा पराभव साजरा केला गेला. इंदिरा गांधी मंडलविरोधी होत्या. राजीव गांधी आरक्षणविरोधी होते, असा आरोप मोदींनी केला.
देशाची दिशाभूल
काँग्रेसना खोटेपणाला राजकारणाचे हत्यार बनवले आहे. काँग्रेसने देशाची दिशाभूल केली आहे. महिलांना ८,५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, तिचे काय झाले? काँग्रेसने मतदानयंत्र, संविधान, आरक्षण, राफेल, एचएएल, एलआयसी, बँक अशा अनेकांबद्दल खोटे बोलण्याचा प्रयत्न केला. खोटेपणा काँग्रेसच्या नसानसांत मुरलेला असून हा खोटेपणा जनतेच्या विवेकाच्या कानाखाली मारण्याचा निर्लज्जपणा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसला तिसऱ्यांदा विरोधी बाकांवर बसण्याचे जनमत मिळाले आहे. तर्क संपले असतील तर फक्त आरडत राहा, अशी उपहासात्मक टिप्पणी मोदीं केली.