ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे नेते मोहम्मद फरहान यांनी गुरुवारी (दि. ५ ऑक्टोबर) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कुत्र्याच्या नावावरून टीका केली. राहुल गांधी यांनी आपल्या कुत्र्याचे नाव ‘नुरी’ ठेवल्यामुळे मुस्लीम समाजातील मुलींचा अवमान झाला असल्याचे फरहान म्हणाले आहेत. राहुल गांधी यांनी हल्लीच कुत्र्याच्या ‘जॅक रसेल टेरियर’ (Jack Russell Terrier) जातीचे तीन महिन्यांचे पिल्लू घेतले. राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधी यांना हे पिल्लू दाखविल्यानंतर त्यांनीही आनंद व्यक्त केला. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून याची माहिती दिली. मात्र आता कुत्र्याला ठेवलेल्या नावावरून राजकारण होत आहे.
एमआयएम पक्षाचे नेते मोहम्मद फरहान यांनी कुत्र्याला नुरी हे नाव दिल्याबद्दल आक्षेप व्यक्त केला. ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी कुत्र्याला नुरी हे नाव दिल्यानंतर पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी आक्षेप नोंदविला. राहुल गांधी यांचे कृत्य निषेधार्ह आणि लाजिरवाणे आहे. कुत्र्याला नुरी हे नाव देऊन गांधी परिवाराने मुस्लीम समाजातील मुलींचा अवमान केला आहे. तसेच मुस्लीम मुली आणि मुस्लीम समाजाबाबत गांधी परिवाराची नकारात्मकताही यातून दिसून येते.”
हे वाचा >> पिटबुल जातीचे कुत्रे धोकादायक का असतात? जाणून घ्या आक्रमक होण्यामागची नेमकी कारणं
दरम्यान राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओला इंटरनेटवर मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांनी कुत्र्याचे पिलू गोव्यावरून दिल्ली येथे आईला भेट देण्यासाठी आणले. राहुल गांधींनी व्हिडीओत म्हटले, “नुरीने गोव्यावरून उड्डाण घेत थेट आमच्या घरी आगमन केले आणि आमच्या आयुष्यात आनंद आणला” व्हिडीओमध्ये सोनिया गांधी कुत्र्याच्या पिलाला बघून आनंदीत झाल्याचे दिसत आहे. तसेच त्यांच्याकडे असलेल्या लपू नावाच्या कुत्र्यासोबत आता नुरी खेळताना दिसत आहे.
ऑगस्ट महिन्यात राहुल गांधी गोव्यामध्ये खासगी दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी श्रावणी पित्रे आणि त्यांचे पती स्टॅनली ब्रिगेन्जा यांची भेट घेतली. दाम्पत्यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले की, राहुल गांधी यांच्या कार्यालयातून आम्हाला ‘जॅक रसेल टेरियर’ जातीच्या कुत्र्याबाबत विचारणा करण्यात आली होती. सदर जातीचे पिलू आमच्याकडे असल्याचे सांगितल्यानंतर राहुल गांधी यांनी गोवा दौऱ्यानिमित्त आमच्या घरी भेट दिली.
जॅक रसेल टेरियर कुत्र्याबद्दल माहिती
जॅक रसेल टेरियर कुत्रा आकाराने अतिशय लहान असतो. त्याची उंची ३५ सेमीपर्यंत वाढू शकते. त्याचे वजन सहसा १० किलोपेक्षा जास्त वाढत नाही. लांडग्यांची शिकार करण्यासाठी इंग्लंडमध्ये या जातीचा विकास करण्यात आला. आकाराने लहान असल्यामुळे या जातीचे कुत्रे पाळण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र त्यांची संख्या अतिशय कमी आहे. बेस्ट फॉर पेट्स या वेबसाईटवरील माहितीनुसार भारतात जॅक रसेल टेरियर जातीचे पिल्लू २० ते ५० हजारांच्या घरात विकत मिळते. राहुल गांधी यांनी गोव्यातील ज्या दाम्पत्याकडून हे पिल्लू घेतले ते अनेक वर्षांपासून गोव्यात डॉग हाऊस चालवत आहेत.