भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर भाजपानं मोठी कारवाई केली आहे. त्यांना सहा वर्षांसाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्येतेतून निलंबित करण्यात आलं आहे. नुपूर शर्मा यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्यावर कथितपणे अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातील कानपूर याठिकाणी दंगल देखील उसळली होती. नुपूर शर्मा यांच्यासोबतच दिल्लीतील भाजपाचे मीडिया प्रमुख नवीन जिंदाल यांना देखील निलंबित करण्यात आलं आहे. आज दुपारी अचानक ही कारवाई करण्यात आली.

नुपूर शर्मा यांना प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वक्तव्यानंतर भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित केलं असून त्यांना सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह म्हणाले की, “भाजपा कोणत्याही धर्मातील धर्मगुरुंचा अनादर करत नाही. कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या भावना दुखावणारा विचार आम्हाला मान्य नाही.”

अरुण सिंह यांनी रविवारी जारी केलेल्या पत्रात म्हटलं की, “भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्माची भरभराट झाली आहे. भारतीय जनता पार्टी सर्व धर्मांचा आदर करते. भाजपा कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचा अपमान करत नाही. कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अपमान करणाऱ्या विचारधारेच्या विरोधात पक्ष ठाम आहे. भाजपा अशा कोणत्याही विचारधारेचा प्रचार करत नाही.”

भाजपाकडून पुढे सांगण्यात आलं की, “भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीच्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार दिला आहे. भारत स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत असताना, आम्ही भारताला एक महान देश बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. जिथे सर्वजण समान असून प्रत्येकजण सन्मानाने राहतो.” विशेष म्हणजे नुपूर शर्मा यांच्यावर मुस्लीम समाजातील लोकांची नाराजी असून वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader