दाऊदला संपविल्याशिवाय मी मुंबई पोलिसांच्या स्वाधीन होणार नाही, अशी मुलाखत १९ वर्षांपूर्वी (१९९६) एका इंग्रजी मासिकाला देणारा राजन सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी असून, अधूनमधून त्याची तब्येत गंभीर होते, असे गेल्यावर्षी पसरविण्यात आले होते. छोटा राजनची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली असून तो डायलिसिसवर आहे. अतिउच्च रक्तदाब आणि मधुमेहसुद्धा त्याला अनेक वर्षांपासून आहे, अशीही माहिती देण्यात आली होती. मात्र, मुंबई पोलीस दलातील सूत्रांनी त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार त्यात तथ्य नव्हते.
२००० मध्ये बँकॉकमध्ये दाऊदच्या गुंडांकडून झालेल्या खुनी हल्ल्यातून बचावलेला छोटा राजन प्रामुख्याने कंबोडिया येथे बराच काळ आश्रयाला होता. मलेशियाजवळच्या समुद्रातही तो राहायचा. काही काळ तो बँकॉकमध्येही होता. त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती गुप्तचर यंत्रणेकडे होती, अशीही माहिती पुढे आली होती.
बँकॉकमधील खुनी हल्ल्यानंतर थायलंड पोलिसांना भरमसाट लाच देऊन तो फरारी झाल्याचा दावा त्या वेळी करण्यात आला होता. पाकिस्तानात लपून बसलेल्या कुख्यात दाऊद इब्राहिमला संपविण्यासाठी सरकारने योजना आखली होती. यासाठी छोटा राजन टोळीतील काही गुंडांची मदत घेण्यात येत होती. त्यांचे एका अज्ञातस्थळी प्रशिक्षणदेखील सुरू होते, असेही त्यावेळी त्यांनी म्हटले होते. मात्र, मुंबई पोलीस दलातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे याची बातमी दाऊदला मिळाल्याने त्याने आपला ठिकाणा बदलल्याचा दावा माजी केंद्रीय गृहसचिव आणि भाजप खासदार आर. के. सिंह यांनी केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा