हवामान अंदाज बरोबर येत नाही म्हणून सर्वानाच भारतीय हवामान खात्यावर टीका करण्याची सवयच लागली आहे, पण या वेळी ओडिशात आलेले पायलिन  वादळ हे महाचक्रीवादळ नाही तर त्याच्या किंचित खालच्या पातळीवरचे आहे, हा भारतीय हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला आहे. काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी हे महाचक्रीवादळ असेल तसेच त्यामुळे त्याचा फार मोठी हानी होईल असा अंदाज दिला होता, पण या वेळी परदेशी संस्थांचा अंदाज खोटा व भारतीय हवामान संस्थेचा अंदाज खरा ठरला आहे.
भारतीय हवामान खात्याचे प्रमुख एल.एस. राठोड यांनी सांगितले की, राष्ट्रीय हवामान खाते या नात्याने आम्हाला लोकांमध्ये भीती पसरवणे योग्य वाटत नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहिलो.  हे महाचक्रीवादळ नाही हा आमचा अंदाज खरा ठरला.
यू.एस. नेव्ही जॉइंट वॉर्निग सेंटर व ब्रिटनच्या हवामान विभागाने पायलिन हे महाचक्रीवादळ असल्याचे सांगितले होते व त्याची तीव्रता जास्त असल्याचे म्हटले होते. अमेरिकेचे विख्यात हवामानशास्त्रज्ञ एरिक हॉल्थस यांनीही, भारतीय हवामान खात्याला पायलिन चक्रीवादळाच्या तीव्रतेचा अंदाज आलेला नसून ते त्या वादळाला कमी लेखत आहेत. पायलिन चक्रीवादळ हे पाचव्या प्रतवारीचे म्हणजे तीव्र आहे असे त्यांनी म्हटले होते.
नेहमी ज्या हवामान खात्याच्या नावाने बोटे मोडली जातात, त्यांनी पायलिन वादळ महाचक्रीवादळ असल्याचे कधीच सांगितले नाही व पाश्चिमात्य देशांच्या दबावाखाली अंदाज बदलला नाही. सुरूवातीपासून भारतीय हवामान खात्याने हे वादळ ताशी २२० कि.मी. वेगाचे असेल म्हणजे महाचक्रीवादळापेक्षा त्याची प्रत एकाने कमी असेल असेच म्हटले होते.
भारतीय हवामान खात्याचा हा मोठा विजय आहे, असे विचारले असता राठोड म्हणाले की, ते आता तुम्ही ठरवा. वैज्ञानिक म्हणून आमची मते असतात, त्याला आम्ही चिकटून राहतो. अतिरंजित अंदाज देण्यापेक्षा राष्ट्रीय हवामान सेवा असली पाहिजे असे आमचे मत आहे. आपल्या हवामान खात्याच्या सहकाऱ्यांनी बरोबर अंदाज दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुकही केले. या वादाळामुळे कुठे पाऊस पडेल व दरडी कोसळतील याचे अंदाज आम्ही बरोबर दिले. वादळाच्या मार्गाचा नकाशा व इतर माहितीही दिली.