Muhammad Yunus : बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. शेख हसीना यांनी सध्या भारतात तात्पुरता आश्रय घेतलेला आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. यानंतर आता बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. या सरकारच्या प्रमुखपदी नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची निवड करण्यात आली आहे.
बांगलादेशच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार गुरुवारी स्थापन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकाराचा शपथविधी गुरुवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान पार पडणार असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी दिली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
हेही वाचा : Bangladesh Violence : शेख हसीनांच्या विरोधक खलिदा झिया अॅक्शन मोडवर, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाल्या…
दरम्यान, मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये १५ सदस्य असू शकतात, असं लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी म्हटलं आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन होणार असून राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी मंगळवारी अर्थतज्ज्ञ मुहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला आंदोलकांचाही पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे. मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशमधील सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं आणि सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच त्यांनी म्हटलं की “सध्याच्या परिस्थितीत शांतता राखण्याचे आणि सर्व प्रकारची हिंसा आणि हानी टाळण्याचे मी सर्वांना आवाहन करतो.”
शेख हसीना भारतात का आल्या?
बांगलादेश सोडल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात येण्याची विनंती केली होती, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी काल संसदेत दिली. दरम्यान, शेख हसीना या भारतात येण्याचं कारणं म्हणजे बांगलादेश आणि भारत या दोन्ही देशाचे संबंध चांगले आहेत. तसेच शेख हसीना यांचे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चांगले संबंध होते. शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मित्र होते. शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर शेख हसीना यांनी अनेक वर्षे दिल्लीतच आश्रय घेतला होता. दरम्यान, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील विरोधी पक्ष काँग्रेस अशा दोघांशीही शेख हसीना यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर भारतात येण्याचा निर्णय घेतला असावा, असं बोललं जात आहे.