संघ, भाजप आणि मोदी यांच्याविरोधात लढायचे कसे, या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद बुधवारी अधिवेशनात चव्हाट्यावर आले. संघद्वेषाचे राजकारण करत असून भाजपने मतदानयंत्रांमध्ये घोटाळा करून निवडणुका जिंकल्या आहेत. संघ व भाजपविरोधात आक्रमक होण्याचा संदेश पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला. मात्र, फक्त नकारात्मक राजकारण करून काँग्रेसला जिंकता येणार नाही, असा विरोधी सूर शशी थरूर यांनी लावला. वैचारिक स्पष्टता नसलेल्या नेत्यांची पदावर नियुक्ती केली जात असल्याची तक्रार करून प्रादेशिक नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे जाब विचारला. देशातील सर्व संस्था भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा भाजपने कशा जिंकल्या हे तिथल्या लोकांना विचारा. ५० लाख मतदार अचानक कसे वाढू शकतात? महाराष्ट्रातील मतदारयाद्या आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला मागितल्या होत्या पण, त्या अजूनही मिळालेल्या नाहीत. आम्हीही निवडणुका पाहिल्या आहेत. पण, ९० टक्के जागा एकच पक्ष जिंकतो अशी निवडणूक पाहिली नाही, अशी टीका करत खरगे यांनी, मतदानयंत्रांमधील कथित घोटाळ्यावरही बोट ठेवले. आम्हाला मतदान यंत्राद्वारे निवडणूक नको, मतपत्रिकेद्वारे घ्या, अशी आग्रही मागणी खरगेंनी केली. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत भाजपविरोधात आक्रमक होण्याची खरगेंची री सचिन पायलट, गौरव गोगोई, कन्हैयाकुमार, इम्रान प्रतापगढी अशा अनेक नेत्यांनी ओढली.
तर निवृत्त व्हा!
काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल केले जात आहेत. जे पक्षाचे काम करत नाहीत, पक्षाची जबाबदारी घेत नाहीत, अशांनी निवृत्त व्हावे. त्यांना आराम करण्याची गरज आहे, असे पक्षाध्यक्ष खरगे यांनी नेते व कार्यकर्त्यांना ठणकावले. जिल्हा काँग्रेस बळकट केल्या जातील व जिल्हाध्यक्षांना व्यापक अधिकार दिले जातील. उमेदवार निवडीमध्ये त्यांचा सहभाग असेल, असे खरगेंनी स्पष्ट केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही जिल्हा काँग्रेसला पक्षातील पाया बनवला जाईल, हा मुद्दा अधोरेखित केला. या प्रक्रियेची सुरुवात १५ एप्रिलपासून गुजरातमध्ये होईल. प्रत्येक राज्यामध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेससाठी कार्यशाळा आयोजित केली जाईल. त्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल, अशी माहिती संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी अधिवेशनामध्ये दिली.
ठरावात राष्ट्रवादाचा समावेश
काँग्रेसच्या ठरावामध्ये राष्ट्रवादाच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आला आहे. जातींमध्ये वा धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा संघाचा राष्ट्रवाद मान्य नसून सर्वांना एकत्र घेऊन जाणारा राष्ट्रवाद काँग्रेसला अभिप्रेत असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. केरळमधील खासदार शफी परम्बिल यांनी, काँग्रेसकडे वैचारिक स्पष्टता असणे गरजेचे असल्याचा मुद्दा अधोरेखित केला. काळ बदलला आहे, लढण्याचे मैदानही बदलले आहे, विरोधकांशी लढण्यासाठी आपल्याकडे नवी आयुधेही असली पाहिजेत. वैचारिक स्पष्टतेचा धागा उत्तर प्रदेशमधील आलोक मिश्रा यांनी पकडला. काँग्रेस नेत्याचा एक मुलगा समाजवादी पक्षात तर एक भाजपमध्ये कुठल्या ना कुठल्या पदावर असेल तर असा काँग्रेस नेता शहराध्यक्ष बनण्याच्या लायकीचा तरी आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. शहराध्यक्षांनी फक्त संघटना बळकट केली पाहिजे, असेही मिश्रा म्हणाले. भाजपशी आम्ही दोन हात करू पण, जे पक्षात काम करत आहेत, त्यांना पुढे आणा, असा मुद्दा राजस्थानमधील रेहाना यांनी मांडला.
थरूर यांचा वेगळा सूर
केरळचे खासदार शशी थरूर यांनी खरगेंच्या विचारांना छेद दिला. फक्त भाजपचे टीकाकार होऊन चालणार नाही. त्याचा काँग्रेसला फायदा मिळण्याची शक्यता नाही. उलट, सकारात्मक विचार करूनच पुढे गेले पाहिजे, असे वेगळा सूर थरूर यांनी लावला. लोकसभेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये आपण पराभूत झालो, आपल्याला मतांची टक्केवारी वाढवता आली नाही. राष्ट्रवादाचा मुद्दा भाजपसारखे इतर पक्ष आपल्याकडून हिरावून घेतात, उलट, आपण राष्ट्रवादाचा मुद्दा हिरिरीने मांडला पाहिजे, असेही थरूर म्हणाले.
© The Indian Express (P) Ltd