राजनीती म्हणजे आपण जे अपेक्षित धरू ते घडेल असे नसते, पाकिस्तानबरोबरची चर्चा रद्द करण्यात आली, त्या वेळी ज्या घटना घडल्या त्यातून पाकिस्तान आपण म्हणू तसे वागेल, अशी आपल्या सरकारची चुकीची समजूत होती हे दिसून आले, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेबरोबर धोरणात्मक भागीदारीवर पुढे जाताना देशाला विश्वासात घ्यायला हवे, असे माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी सांगितले.  
खुर्शीद यांनी सांगितले, की आपण आताच काही निष्कर्ष काढणार नाही पण मोदी यांच्या सरकारने अवलंबलेल्या परराष्ट्र धोरणास जास्त गुणही देणार नाही.  पाकिस्तान हा फार कठीण देश आहे. त्यांनी आपल्याला अनेकदा अडचणीत आणले आहे,याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘हेडलाइन्स टुडे’ या वाहिनीवरील ‘नथिंग बट द ट्रथ’ या करण थापर यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. हुरियत नेते नवी दिल्लीत पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांना भेटल्याच्या कारणास्तव भारताने परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा रद्द केली. त्या संदर्भात खुर्शीद म्हणाले की,  पाकिस्तान अशी खेळी करील याची कल्पना सरकारला आली नाही काय, आपण त्यात गाफील राहिलो व नंतर परत शूरतेचा आव आणत चर्चा रद्द केली. पैसे देऊन आपल्याला हवे ते घेऊन यावे अशी राजनीती नसते हे मोदींना समजले नाही. राजनीती ही गुंतागुंतीची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.