India’s Beautiful Picture from space: नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या काही दिवसांपूर्वीच तब्बल नऊ महिन्यांनी अंतराळातून पृथ्वीवर परतल्या. अवकाशातून भारत फारच सुंदर दिसतो, असे त्यांनी सांगितले. तसेच हिमालय, मुंबई आणि गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांचा त्यांनी खास उल्लेख केला होता. आता आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकानेही अंतराळातून भारताचा फोटो त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. ताऱ्यांच्या समुहाप्रमाणे चकाकणारी अशी भारताची प्रतिमा दिसत असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाने यूएसचा मध्य पश्चिम भाग, भारत, आग्नेय आशिया आणि कॅनडा यांचे अनुक्रमे चार फोटो एक्सवर शेअर केले आहेत. अवकाशात तारे आणि खाली चमचमणारे दिवे यामुळे पृथ्वीचे क्षितिज प्रकाशमय झाले आहे, असे कॅप्शन या फोटोंसह लिहिलेले आहे.
भारताचा फोटो पाहत असताना शहरी भागातील दिव्यांची दाटी ही लोकसंख्येची घनता दर्शवत आहे. अंधाऱ्या रात्री शहरातील दिव्यांचा प्रकाश हा अवकाशातून प्रकाशाचे मोठे झाले असल्याचे भासवत आहे.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या एक्स हँडलवर हे फोटो शेअर झाल्यापासून अनेकांनी त्यावर कमेंट करून आश्चर्य व्यक्त केले आहे. या पोस्टला १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तर दोन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलेले आहे. अनेकांनी या पोस्टला शेअर केले आहे. “हे अद्भूत चित्र आहे. आपण एका विस्मयकारक ग्रहावर राहत आहोत”, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.
आणखी एका युजरने म्हटले आहे की, हे खूप छान फोटो आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाने हे सुंदर दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आभार. हा सुखद अनुभव आहे. एका युजरने खोचक टिप्पणी करताना मानवावर टीका केली आहे. “हे सुंदर चित्र आपण नष्ट करण्याच्या मार्गावर आहोत. जे काही चांगले आहे, ते टिकवायचे नाही, हा चंग आपण बांधलेला आहे”, असे त्याने म्हटले.
भारता व्यतिरिक्त इतर प्रदेशांच्या फोटोंनाही चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. अवकाशातून रात्रीची दिसणारी पृथ्वी अनेकांना मोहित करत आहे.