योग हा भारताने जगाला दिलेला सांस्कृतिक ठेवा असून पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त २१ जूनला हजारो लोक या योगदिनात सहभागी होणार आहेत. संयुक्त राष्ट्रात होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज असतील.
अमेरिका व न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळ २०-२२ जूनला येथे येत आहे. संयुक्त राष्ट्रातील कार्यक्रमाशिवाय त्या टाइम्स स्क्वेअर येथील कार्यक्रमात सहभागी होतील. उत्तर अमेरिकेतील टेम्पल सोसायटीने योग प्रात्यक्षिकांचे आयोजन केले आहे. लिंकन सेंटर येथे श्री श्री रविशंकर कार्यक्रम घेणार आहेत. दिवसभराच्या कार्यक्रमात टाइम्स स्क्वेअर येथे ३० हजार लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. ग्लोबल सिटिझन फोरमचे अध्यक्ष बी.के.मोदी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास सहा हजार लोक उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. सायंकाळी नृत्य, संगीत व ध्यानाच्या माध्यमातून योगाचे दर्शन घडवले जाईल. शंभर शहरांत योगाथॉन घेण्यात येणार असून त्यात वॉशिंग्टन, बोस्टन, ओहिओ, न्यूजर्सी, सानफ्रान्सिस्को या शहरांचा समावेश आहे. योग शिक्षक वाई लाना यांचा नमस्ते हा म्युझिक अल्बमही खुला केला जाणार आहे. योग हा आधुनिक युगाचा मंत्र करण्याचा आमचा उद्देश असून आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणजे भारतात सुरू झालेल्या एका सांस्कृतिक वारशास मिळालेली जगन्मान्यता आहे, असे भारताचे महावाणिज्यदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितले.

आझमखान यांना सल्ला
बलिया:भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांना योग करावा, असा सल्ला दिला आहे. खान यांनी रोज सूर्यनमस्कार घातले तर ते हास्यास्पद विधाने करण्यापासून स्वत:ला निश्चितच रोखू शकतील, असेही आदित्यनाथ यांनी पुढे स्पष्ट केले. सध्या आझम खान यांच्या बोलण्याला कोणीही गांभीर्याने घेत नाही. ते सतत हास्यास्पद आणि उथळ विधाने करण्यातच धन्यता मानत आहेत; परंतु त्यांनी सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात केल्यास केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही अधिक सुदृढ होईल आणि हास्यास्पद विधाने करण्यापासून ते स्वत:ला रोखू शकतील, असे ते वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.

Story img Loader