मालदिवमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम जमावाने घुसून बंद पाडला. भारतीय उच्चायुक्ताकडून मालदिवची राजधानी मालेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरु होण्याआधी आंदोलकांनी योगा इस्लामच्या विरोधात असलेले पोस्टर झळकावले. ‘द एडिशन’ या मालदीव वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, योग करणं सूर्याची उपासना करण्यासारखं असून हे इस्लामविरोधी असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय युवा, क्रीडा आणि सामुदायिक सक्षमीकरण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सांस्कृतिक केंद्राने एका तासाचा कार्यक्रम आयोजित केला होता. जमावाने घुसखोरी करत गोंधळ घातल्याने कार्यक्रम पूर्ण होऊ शकला नाही.
आंदोलक हातामध्ये बॅनर घेऊन घोषणाबाजी करत होते. योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम तात्काळ बंद करावा आणि मैदान रिकाम करावं अशी या आंदोलकांची मागणी होती. कार्यक्रमाला उपस्थित काहीजणांनी आपल्याला धमकावण्यात आल्याचा आरोप केला आहे.
जमावाने घुसखोरी केली तेव्हा या कार्यक्रमाला अनेक राजदूत, सरकारी अधिकारी आणि मालदीव सरकारचे मंत्री उपस्थित होते.
व्हिडीओमध्ये मैदानात योगा सुरु असताना जमाव हातात काठ्या आणि झेंडे घेऊन येत असल्याचं दिसत आहे. आंदोलकांनी यावेळी कार्यक्रमस्थळी तोडफोडदेखील केली. परिस्थिती अजून बिघडण्याआधी पोलिसांनी मध्यस्थी करत नियंत्रण मिळवलं. आंदोलक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना त्रास देत असताना पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या.
दरम्यान याप्रकरणी चौकशी केली जाईल असं सरकारने सांगितलं आहे.
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याच्या संयुक्त राष्ट्राच्या ठरावाला सहप्रायोजित करण्याच्या बाजूने मतदान करणाऱ्या १७७ राष्ट्रांमध्ये मालदीवचा समावेश होता.