आमची कंपनी खुल्या व्यवस्थेत काम करीत आहे व इंटरनेट समानतेच्या मुद्दय़ाचे सदैव समर्थनच करील. काही मूलभूत कार्यक्रमाच्या अंतर्गत मोफत इंटरनेट सेवा देण्याची योजना आखत आहे, त्यावर टीका होत असली तरी तो कार्यक्रम राबवला जाईल, अशी ग्वाही ‘फेसबुक’ या समाज माध्यम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी दिली.

आयआयटी दिल्ली येथे झकरबर्ग यांनी सांगितले की,जगभरात आम्ही इंटरनेट समानतेचे समर्थन करीत आहोत, पण त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना सेवा मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करीत आहोत. मोफक मूलभूत कार्यक्रमाबाबत ते म्हणाले की, जगात इंटरनेट समानतेचे समर्थन करीत असताना आम्ही या कार्यक्रमावर माघार घेणार नाही. ‘इंटरनेट डॉट ओआरजी’ या सेवेचेच नाव आता ‘फ्री बेसिक ’ असे केल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही कुठलीही माहिती गाळून किंवा विशिष्ट संकेतस्थळे दाखवणारी सेवा देणार नाही, तर ही सेवा खुली असेल. इंटरनेट ओआरजी सेवा २४ देशात असून १.५० कोटी लोक त्याचा लाभ घेत आहेत. ही संख्या कमी नाही. भारतात इंटरनेट ओआरजी सेवा १० लाख लोकांपर्यंत पोहोचली आहे.
जगाच्या दृष्टीने भारतीय बाजारपेठ महत्त्वाची असल्याची कारणे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, अब्जावधी लोकांना जोडण्याचे काम इंटरनेट करीत आहे. हे काम भारताला वगळून करताच येणार नाही.
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, येथे १३ कोटी लोक फेसबुक वापरतात. त्यामुळे इंटरनेटची सेवा देणे गरजेचे आहे. झकरबर्ग हे दुसऱ्यांदा भारत भेटीवर आले आहेत.