इंटरपोलने फरार व्यापारी मेहुल चोक्सी याच्याविरोधात जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेतली आहे. तथापि, भारतातील सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (सीबीआय) अद्याप या निर्णयाची पुष्टी केली नाही. पण इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस मागे घेतल्याने मेहुल चोक्सीला आता जगभर मुक्तपणे प्रवास करता येणार आहे. इंटरपोलने चोक्सीला दिलासा दिला आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.
मेहुल चोक्सीने अलीकडेच अँटिग्वा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून भारत सरकारला प्रतिवादी बनवले होते. संबंधित याचिकेत चोक्सीने म्हटलं की, दोन भारतीय गुप्तहेरांनी माझं अँटिग्वा येथून अपहरण केलं आणि जून २०२१ मध्ये आपल्याला जबरदस्तीने डॉमिनिका रिपब्लिका येथे नेलं. संबंधित गुप्तहेर ‘रिसर्च अँड अॅनालिसिस विंग’ अर्थात ‘रॉ’चे एजंट्स असण्याची संभाव्यता आहे.
हेही वाचा- रॉ एजंट्सनी अपहरण करुन आपल्याला मारहाण केली; मेहुल चोक्सीचे गंभीर आरोप
खरंतर, २०१८ मध्ये भारत सरकारने अँटिग्वा देशाकडे चोक्सीचं प्रत्यार्पण करण्याची विनंती केली होती. त्याच वर्षी मेहुल चोक्सी अँटिग्वाचा नागरिक बनला होता. चोक्सी हा सध्या भारतीय नागरिक नसला तरी अद्याप त्याचा भारतीय पासपोर्ट रद्द केला नाही.
आरोपी मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी यांनी भारतातील सर्वात मोठा बँकिंग गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांनी अंदाजे दोन अब्ज डॉलरची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर भारतात गुन्हा दाखल आहे. केंद्रीय तपास यंत्रणा दोघांच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहेत.