रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे सर्व जगाचं लक्ष या दोन देशांमधील परिस्थितीकडे वळलं आहे. या युद्धाचा जगावर परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाची राजधानी मोस्कोतील वरिष्ठ संशोधक अलेक्सी कुप्रियानोव्ह (Alexey Kupriyanov) यांनी भारतासाठी जसा पाकिस्तान आहे, तसा आमच्यासाठी युक्रेन असल्याचं मत व्यक्त केलंय. ते इस्टिट्युट ऑफ वर्ल्ड इकोनॉमी अँड इंटरनॅशनल रिलेशन (Institute of World Economy and International Relations – IMEMO) या रशियाच्या सायन्स अकॅडमीत संशोधन करत आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या निरुपमा सुब्रमनियम यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं.
अलेक्सी कुप्रियानोव्ह या मुलाखतीत म्हणाले, “काही भूभागावर कब्जा मिळवण्याबाबत भारताचा इतिहास समृद्ध आहे आणि ते भारतासाठी अडचणीचं आहे. गोवा, हैदराबाद, सिक्किम रेफरंडम आणि अशा अनेक उदाहरणांमध्ये भारताने हा भूभाग आपल्या सीमारेषेत समाविष्ट केला. या सर्व घटनांमध्ये रशियाने कायम भारताला पाठिंबा दिला आहे. रशियाने कधीही भारताच्या या कृतींना विरोध केलेला नाही. त्यामुळे आम्हाला भारताची भूमिका माहिती आहे. भारत आमचा जुना आणि चांगला मित्र आहे.”
“भारत तटस्थ भूमिका घेईल असं आम्हाला वाटतं”
“असं असलं तरी भारताला इतर गोष्टींचा विचार करून अमेरिकेशी जवळीक ठेऊन राहावं लागण्यालाही पर्याय नाही हेही आम्ही समजू शकतो. त्यामुळे भारत तटस्थ भूमिका घेईल असं आम्हाला वाटतं,” असं अलेक्सी कुप्रियानोव्ह यांनी सांगितलं.
“पुतिन यांना युक्रेनला पुन्हा रशियात समाविष्ट करायचं नाही”
अलेक्सी कुप्रियानोव्ह पुढे म्हणाले, “पुतिन यांना युक्रेनला पुन्हा रशियात समाविष्ट करायचं आहे असं ते म्हणाले नाहीत. ते केवळ इतकंच म्हणाले की रशियाच्या स्टॅलिन राजवटीत युक्रेनला मोठा भूभाग देण्यात आलाय.”
हेही वाचा : विश्लेषण : रशियाचे आक्रमण कधीपर्यंत चालेल? युक्रेनच्या मदतीला नाटो येणार का?
“भारत आणि पाकिस्तान साधर्म्यासाठी मी क्षमा मागतो, पण भारतासाठी जसा पाकिस्तान आहे, तसा आमच्यासाठी युक्रेन आहे. त्यामुळेच आम्हाला आमच्या सीमेवर शांततापूर्ण आणि भारत समर्थक पाकिस्तान हवा आहे,” असंही कुप्रियानोव्ह यांनी नमूद केलं.