पीटीआय, नवी दिल्ली
‘न्यूजक्लिक’ वृत्त संकेतस्थळ प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांची नवी दिल्ली पोलीस चौकशी करत आहेत. नवलखा यांच्या नवी मुंबईतील ऐरोली येथील निवासस्थानी चौकशीसाठी दिल्ली पोलिसांचे पथक पोहोचले. ‘न्यूजक्लिक’ने चीनच्या समर्थनार्थ दुष्प्रचार करण्यासाठी परदेशातून मोठय़ा प्रमाणात निधी घेतल्याचा आणि भारत-विरोधी कारवाया केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी ठेवला आहे.दिल्ली पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी करत आहेत. यापूर्वी नवलखा एल्गार परिषद प्रकरणी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नजरकैदेत होते. त्यांना १९ डिसेंबरला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात ‘न्यूजक्लिक’विरोधात बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केला. त्यानंतर ‘न्यूजक्लिक’चे संस्थापक-संपादक प्रबीर पुरकायस्थ व मनुष्यबळ विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यापैकी अमित चक्रवर्ती यांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा अर्ज जबाबासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे.