मंगळवारी शेअर्सची विक्री करण्याची चढाओढ लागल्यामुळे शेअर बाजार कोसळला आणि जवळपास 4.95 लाख कोटी रुपये हवेत विरले. जागतिक बाजारांची घसरण झाल्यानंतर त्याच पावलावर भारतीय शेअर बाजारही गडगडला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी बाजार उगडताक्षणी 3.6 टक्क्यांनी किंवा 1,275 अंकांनी घसरला आणि 34,000 खाली गेला. या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांचं एकूण भांडवली मूल्यही 4,94,766 कोटी रुपयांनी कमी होऊन 1,43,00,981 कोटी रुपये झालं.
शेअर बाजाराची घसरण सलग सहाव्या सत्रात सुरू राहिली आणि सेन्सेक्स 1,274 अंकांनी घसरत 33,482.81 या पातळीवर आला. बांधकाम क्षेत्र, ग्राहकोपयोगी वस्तू, धातू, बँका अशा सर्वच क्षेत्रांमधल्या शेअर्सची विक्री आज बघायला मिळाली. जागतिक बाजारातल्या पडझडीचा प्रभाव भारतावर पडला असून स्थानिक बाजाराला सावरण्यासाठी भारताला काय करता येईल याचा विचार होईल असं मत महसूल सचिव हसमुख अढिया यांनी व्यक्त केलं.
नुकत्याच पार पडलेल्या बजेटमध्ये शेअर्सवरील दीर्घकालीन नफ्यावरही कर लावण्यात आला आहे. याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम बाजारावर झाला असून सलग सहा सत्र बाजार घसरत राहिला व शेवटचा घाव जागतिक बाजारातल्या त्सुनामीने मंगळवारी घातला.
तर, या दीर्घकालीन नफ्यावरील कराबाबत काय करता येईल याचा सरकार वितार करेल असे अढिया म्हणाले. मुंबई शेअर बाजारातील 2,221 शेअर्सचे भाव गडगडले तर 169 शेअर्स वधारले व 83 कंपन्यांचे शेअर्स अबाधित राहिले.
अन्य देशांमधील निर्देशांक कोसळल्यामुळे भारतीय शेअर बाजार कोसळल्याचे मत एंजल ब्रोकिंगने व्यक्त केलं आहे. अमेरिकी शेअर बाजारानं ऐतिहासिक म्हणता येईल अशी पडझड बघितली. वाढत्या व्याजदारांमुळे घाबरून जाऊन शेअर्सची विक्री करण्यात आली डाऊ निर्देशांक 4.6 टक्क्यांनी घसरला. इंग्लंडमधला शेअर बाजारही कोसळला तसेच जपान व अन्य आशियाई देशांनीही शेअर्सचे घसरते भाव अनुभवले. याचा थेट परिणाम भारतीय बाजारात दिसून आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.