मुंबई : अमेरिकी अर्थव्यवस्थेत मंदीचा शिरकाव होण्याची भीती आणि पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती यांच्या एकत्रित परिणामांमुळे सोमवारी जगभरातील भांडवली बाजारांनी अक्षरश: लोळण घेतली. भारतीय भांडवली बाजारांत सेन्सेक्स २२२२.५५ अंशांनी खाली कोसळला तर, निफ्टीनेही तीन टक्क्यांची घसरण नोंदवली. त्यामुळे दिवसभरातील एकाच सत्रात गुंतवणूकदारांनी १५ लाख कोटींहून अधिक रुपये गमावले. भांडवली बाजारांतील ही पडझड मंगळवारीही कायम राहण्याची भीती आहे.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २,२२२.५५ अंशांनी म्हणजेच २.७४ टक्क्यांनी घसरून ७८,७५९.४० अंशांवर बंद झाला. ही सेन्सेक्सची एका महिन्यातील नीचांकी पातळी आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी म्हणजेच ४ जून २०२४ नंतरची ही मोठी घसरण आहे. दिवसभरात, सेन्सेक्सने २,६१३ अंश गमावत ७८,२९५.८६ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ६६२.१० अंशांची माघार घेत २४,०५५.६० ही महिनाभरातील नीचांकी पातळी गाठली. दिवसभरात त्याने २४,००० अंशांची महत्त्वाची पातळी मोडत २३,८९३.७० या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला.
अमेरिकेतील नोकऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून बेरोजगारीचा दर ऑक्टोबर २०२१पासूनच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच ४.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यातच शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीने अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीची झळ बसण्याची शक्यता व्यक्त केली होती. या धास्तीनेच सोमवारी भांडवली बाजार कोसळले. जपानच्या मध्यवर्ती बँकेने १७ वर्षांनंतर मुख्य व्याजदरांत वाढ केल्याचाही परिणाम बाजारांवर दिसून आला. विशेषत: जपानच्या भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक निक्केई २२५ सोमवारच्या सत्रात १२.४ टक्क्यांनी घसरला. आशियाई बाजारांमध्ये, सोल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँगमधील भांडवली बाजारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली.
१९ लाख कोटींची झळ सोमवारच्या सत्रातील घसरणीने गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटींहून अधिक नुकसान झाले. मुंबई शेअर बाजारातील सुचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ४४१.८४ लाख कोटींपर्यंत खाली आले. शुक्रवारच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे ४.४६ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. परिणामी दोन सत्रात एकूण १९ लाख कोटींहून अधिक नुकसान झाले.
© The Indian Express (P) Ltd