भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक ‘भारतमाता की जय’चे नारे देत असले तरी केंद्र सरकारने पाकिस्तानातील आयएसआयच्या एकाला तपासासाठी भारतात बोलावून भारतमातेच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केली. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडले.
पठाणकोट हवाईतळावरील दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानातून आलेल्या संयुक्त तपास पथकात तेथील आयएसआयचाही एक जण होता. या मुद्द्यावरून केजरीवाल यांनी भाजपला धारेवर धरले आहे. ‘मुँह में राम बग़ल में छुरी’ असाच हा प्रकार असल्याचे सांगत सरकारने भारतमातेच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.
पठाणकोट येथे दोन जानेवारीला लष्कराच्या हवाई तळावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात तपासासाठी पाकिस्तानचे पाच सदस्यीय पथक येथे आले होते, त्यात आयएसआयच्या एकाचा समावेश होता. या पथकाने हवाई तळाला भेट दिली. दहशतवाद्यांनी भिंती ओलांडून प्रवेश करताना हवाई तळावर हल्ला केला होता तेथेच वेगळे प्रवेशद्वार आता केले आहे. पाकिस्तानी पथकाने दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात देशाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती.

Story img Loader