पीटीआय, मुंबई
खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासमोर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) रविवारी होणाऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाचे आव्हान असेल. या वेळी मुंबईचा प्रयत्न आपली विजयी लय कायम राखण्याचा असेल. या दोन्ही संघांचे आतापर्यंत समान १० गुण आहेत. चांगल्या निव्वळ धावगतीच्या आधारे मुंबई ही गुणतालिकेत लखनऊच्या पुढे आहे. दोन्ही संघांनी नऊपैकी पाच सामने जिंकले आहेत.
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघाचा प्रयत्न विजय मिळवण्यासह आपली निव्वळ धावगती सुधारण्याचा असेल. या हंगामाच्या साखळी फेरीतील काहीच सामने आता शिल्लक असून सर्व संघांसाठी निव्वळ धावगती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे दोन्ही संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील. तेव्हा मुंबईच्या उष्ण व दमट वातावरणाचा सामना खेळाडूंना करावा लागेल. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.
पूरन, मार्शवर लखनऊची मदार
लखनऊसाठी कर्णधार ऋषभ पंतची खराब लय चिंतेचा विषय आहे. कारण, त्याने आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यांत केवळ १०६ धावा केल्या आहे. त्यामुळे मुंबईच्या भक्कम गोलंदाजी माऱ्यासमोर त्याचा चांगला कस लागेल. लखनऊचा संघ निकोलस पूरन (३७७), मिचेल मार्श (३४४) आणि एडीन मार्करम (३२६) या विदेशी फलंदाजांवर अधिक अवलंबून आहे. मुंबईविरुद्धही या फलंदाजांकडून लखनऊला अपेक्षा असणार आहे. लखनऊकडे नामांकित गोलंदाज नसले, तरीही गोलंदाजांनी परिस्थितीनुसार कामगिरी करीत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्याकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक १२ बळी मिळवले आहेत आणि मूळचा मुंबईचा असल्याने येथील परिस्थितीची त्याला चांगली कल्पना आहे. त्याला रवी बिश्नोई व आवेश खानकडून योग्य सहकार्य अपेक्षित असेल.
मुंबईची फलंदाजांवर भिस्त
●मुंबईचा संघ निर्णायक क्षणी चांगल्या लयीत आहे. सलग चार सामने जिंकत त्यांनी ‘प्लेऑफ’मध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत स्वत:ला पुढे ठेवले आहे.
●वानखेडे स्टेडियमवर सामना होणार असल्याने त्यांना परिस्थितीची चांगली कल्पना आहे. मुंबईसाठी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बिल्ट आणि हार्दिक पंड्या यांना योग्य वेळी सूर गवसला आहे.
●त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ अधिक दबावाखाली असेल. रोहितने चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद संघाविरुद्ध आक्रमक अर्धशतकी खेळी केल्या.
●सूर्यकुमार ट्वेन्टी-२० प्रारूपात आपल्या आक्रमक फलंदाजी शैलीसाठी ओळखला जातो. तसेच, तिलक वर्माही मोठे फटके मारण्यास सक्षम आहे.
●वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि ट्रेंट बोल्ट यांनीही आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडली आहे. सर्वांचे लक्ष जसप्रीत बुमराकडे असणार आहे.
●वेळ : दुपारी ३.३० वा. ●थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, २ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.