इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अकराव्या हंगामातील खेळाडुंच्या लिलाव प्रक्रियेला शनिवारी प्रारंभ झाला. यावेळी संघ मालकांनी अनेक खेळाडुंना कोटयावधी रुपयांच्या बोली लावून खरेदी केले. यावरून भाजपाचे खासदार बाबुल सुप्रियो चांगलेच संतापले आहेत. त्यांनी या लिलावातील बड्य़ा रकमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संघाचे मालक आणि खेळाडुंवर जास्त कर आकारण्यात आला पाहिजे, असे ट्विट केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी लिलावात कोट्यावधी रुपयांचा भाव मिळालेले अनेक खेळाडू इतक्या मोठ्या मोबदल्याच्या लायकीचेही नाहीत, असे म्हटले आहे.
Most of these players don’t even deserve half the obscene amount they are being bought for at the #IPLAuction ? I hope HUGE taxes are levied in such both on the players & the payers so that at least the Nation can benefit from this ridiculous display of opulence !!!
— Babul Supriyo (@SuPriyoBabul) January 27, 2018
या खेळाडूंपैकी अनेकजण इतक्या मोठ्या रकमांच्या लायकीचे नाहीत. अशा खेळाडूंवर आणि त्यांना खरेदी करणाऱ्यांवर मोठा कर आकारला जावा असे मला वाटते. त्यामुळे देशात सुरू असलेल्या या श्रीमंतीच्या हास्यास्पद प्रदर्शनापासून काहीतरी लाभ होऊ शकेल, असे मत त्यांनी मांडले.
IPL 2018 AUCTION: बेन स्टोक्स महागडा खेळाडू, अनुभवी खेळाडूंना वगळून संघमालकांची तरुणांना पसंती
दरम्यान, आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा वरचष्मा राहिलेला पहायला मिळाला. प्रत्येक संघ मालकांनी अखेरच्या सत्रामध्ये भारतीय खेळाडूंना खरेदी करण्यामध्ये रस दाखवला. या कारणामुळे अनेक स्थानिक क्रिकेटपटूंना पहिल्या दिवशीच्या लिलावात कोट्यवधींच्या बोली लागलेल्या पहायला मिळाल्या. पहिल्या दिवसाचा लिलाव हा अनेक खेळाडूंसाठी सरप्राईज पॅकेजही ठरला. अनेक संघमालकांनी आपल्या जुन्या खेळाडूंना कायम न राखता नवीन खेळाडू घेण्याकडे आपला भर दिला. इंग्लंडचा बेन स्टोक्स पहिल्या दिवशीच्या लिलावातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाने तब्बल १२ कोटी ५० लाख रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतले. तर चेन्नई सुपर किंग्जमध्ये महेंद्रसिंह धोनीचा हुकमी एक्का समजला जाणारा रविचंद्रन आश्विन यंदाच्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाकडून खेळताना दिसणार आहे. पंजाबच्या संघाने आश्विनला ७ कोटी ६० लाखांची बोली लावत आपल्याकडे घेतले.