एपी, बैरुत
इस्रायलने गाझा पट्टीवरील हल्ले थांबवावेत, असे आवाहन इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमिरबदोल्लाहियान यांनी शनिवारी केले. हेजबोला युद्धात सामील झाल्यास हे युद्ध मध्यपूर्वेच्या इतर भागांमध्ये पसरेल आणि त्यामुळे इस्रायलला ‘प्रचंड भूकंपाचा धक्का बसेल’, असा इशारा त्यांनी दिला.लेबनॉनमधील हेजबोला गटाने युद्धाचे पैलू विचारात घेतले असून, इस्रायलने लवकरात लवकर गाझावरील हल्ले थांबवावेत, असे अमिरबदोल्लाहियान पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
हेजबोलाजवळ इस्रायलमध्ये कुठेही मारा करू शकणाऱ्या अचूक- दिग्दर्शित क्षेपणास्त्रांसह सुमारे दीड लाख क्षेपणास्त्रे असल्याचा अंदाज असून, त्यामुळे त्याच्यापासून गंभीर स्वरूपाचा धोका असल्याचे इस्रायलला वाटते.या गटाजवळ सीरियातील १२ वर्षांच्या संघर्षांत भाग घेतलेले हजारो कडवे योद्धे असून, याशिवाय त्यांच्याजवळ निरनिराळय़ा प्रकारचे लष्करी ड्रोनही आहेत. पॅलेस्टाईनमधील हमास या अतिरेकी गटाने गेल्या शनिवारी इस्रायलवर हल्ला करून हजारो इस्रायली नागरिक आणि सैनिकांचे बळी घेतल्यानंतर हेजबोलाचे लढवय्ये लेबनॉनच्या इस्रायललगत असलेल्या सीमांवर पूर्णपणे सज्ज आहेत.
योद्धय़ांनी सीमेवरील इस्रायली चौक्यांवर अनेक क्षेपणास्त्रे डागली, असे हेजबोलाने शुक्रवारी सांगितले होते. आपण हेजबोलाचा नेता सय्यद हसन नसरल्ला याची भेट घेतली व त्याने या गटाच्या लेबनॉनमधील तयारीची माहिती दिली, असे इराणचे परराष्ट्रमंत्री अमिरबदोल्लाहियान यांनी सांगितले.
हेही वाचा >>>संजय सिंहांनी भर न्यायालयात अदाणींचं नाव घेतल्यानं न्यायाधीश संतापले; सुनावत म्हणाले, “तुम्हाला…”
परदेशी नागरिक इजिप्तमध्ये सुरक्षित जाण्यावर सहमती
गाझामधील परदेशी नागरिकांना राफा सीमा चौकीमार्गे इजिप्तमध्ये जाण्याची परवानगी देण्याचे इजिप्त, इस्रायल व अमेरिका यांनी मान्य केले असल्याची माहिती इजिप्तच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पॅलेस्टाईन प्रदेशात अडकून पडलेले परदेशी नागरिक ज्या भागातून जातील, तेथे हल्ला न करण्याचे इस्रायलने मान्य केले असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. याबाबतच्या वाटाघाटींमध्ये कतारही सहभागी होता, असेही तो म्हणाला.