Iran Offers Mediation Between India And Pakistan: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा संबंध असल्याचे पुरावे मिळताच भारताने त्यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका स्वीकारली असून, अनेक कठोर पाऊले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून भारताने १९६० सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. याचबरोबर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहे.
दुसरीकडे पाकिस्ताननेही शिमला करार रद्द करत भारतीय विमान कंपन्यांसाठी त्यांची हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तवणावाच्या पार्श्वभूमीवर १३व्या शतकातील पर्शियन कविता शेअर करत भारत आणि पाकिस्तानला मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे.
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टबरोबर त्यांनी १३व्या शतकातील पर्शियन कवितेचा उल्लेख करत भारत आणि पाकिस्तानला मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे.
बंधुतुल्य शेजारी
सय्यद अब्बास अरघची यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “भारत आणि पाकिस्तान हे इराणचे बंधुतुल्य शेजारी आहेत. आमचे संबंध शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक आणि सभ्यतेच्या संबंधांवर आधारित आहेत. इतर शेजाऱ्यांप्रमाणे, आम्ही त्यांना आमचे सर्वोच्च प्राधान्य मानतो.”
कठीण काळात समजूतदारपणा…
“पर्शियन कवी सादी यांनी शिकवलेल्या या भावनेनुसार, या कठीण काळात अधिक समजूतदारपणा निर्माण करण्यासाठी इराण, भारत आणि पाकिस्तान असलेल्या आपल्या चांगल्या अधिकाऱ्यांचा वापर करण्यास तयार आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.
१३व्या शतकातील पर्शियन कवितेचा उल्लेख
यावेळी त्यांनी, “मानवजाती ही एका एकसंध घटकाची सदस्य आहे, संपूर्ण सृष्टीतआत्मा आणि सार एकच आहे. जर एकाला वेदना झाली तर दुसराही अस्वस्थ होतो”, या १३ व्या शतकातील पर्शियन कवितेचा उल्लेख केला आहे.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्लाच्या हल्लेखोरांशी पाकिस्तानचा थेट संबंध असल्याचे पुरावे सापडल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला कळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ जागतिक नेत्यांशी फोनवर केलेली चर्चा, दिल्लीतील ३० हून अधिक राजदूत, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि परराष्ट्र मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकींचा हा भाग आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.