आपल्या पहिल्यावहिल्या इस्रायल भेटीपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणला सणसणीत इशारा देऊन इस्रायलला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. अणुबॉम्बची निर्मिती करण्यासाठी इराण युद्धपातळीवर प्रयत्न करत असून त्यांनी खरोखर तसे केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा ओबामा यांनी इराणला दिला. ओबामा हे सहा दिवसांनी इस्रायलच्या दौऱ्यावर जात असून त्या पाश्र्वभूमीवर एका खासगी इस्रायली वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
इस्रायल आणि इराणचे हाडवैर असल्याने या मुलाखतीत इराणला तंबी देण्याची संधी ओबामा यांनी साधली. अण्वस्त्रसज्ज होण्यासाठी इस्रायलचे जोरदार प्रयत्न सुरू असून वर्षभरात त्यांच्याकडे अणुबॉम्ब असेल, अशी आमची माहिती आहे. त्यांनी हे पाऊल उचलू नये, असे आम्हाला वाटते. हा प्रश्न आम्ही मुत्सद्दीपणे सोडवू इच्छितो, मात्र तरीही त्यांनी आपला हट्ट सोडला नाही, तर आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत, अमेरिका किती ताकदवान आहे, हे सर्वाना ठाऊक आहे. त्यामुळे या इशाऱ्याचा गर्भितार्थ त्यांनी समजून घ्यावा, असे ते म्हणाले. इराणने अण्वस्त्रांची निर्मिती केल्यास इस्रायलसाठी ते धोक्याचे ठरू शकेल तसेच आसपासच्या देशांमध्ये अण्वस्त्रसज्ज होण्याची घातक स्पर्धा सुरू होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा