न्यूयॉर्क : सीएनएनच्या ज्येष्ठ पत्रकार क्रिस्टीन अमानपोर यांनी केस झाकण्यास नकार दिल्यामुळे इराणचे अध्यक्ष अहमद रईसी यांनी मुलाखत रद्द केली. संयुक्त राष्ट्र महासभेच्या पाश्र्वभूमीवर बऱ्याच आधी ही मुलाखत निश्चित झाली होती. मात्र मुलाखत सुरू होण्याच्या काही क्षण आधी क्रिस्टिना यांनी हिजाब परिधान करावा, अशी मागणी रईसी यांनी केली. त्याला क्रिस्टिना यांनी स्पष्ट नकार दिला.

‘‘मी अत्यंत आदराने सीएनएनकडून, वैयक्तिक पातळीवर आणि सर्व महिला पत्रकारांच्या वतीने केस झाकण्यास नकार दिला. कारण त्याची काहीच गरज नाही,’’ असे अमानपोर म्हणाल्या. तेहरानमध्ये जन्मलेल्या अमानपोर यांनी इराणमध्ये वार्ताकन करताना नेहमीच हिजाब वापरल्याचेही स्पष्ट केले.

निदर्शने सुरूच

दुबई/तेहरान : पोलीस कोठडीत तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये अद्याप हिंसक निदर्शने सुरूच असून यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २६पेक्षा जास्त असल्याचा दावा एका इराणी वाहिनेने केला. दुसरीकडे सरकारला पाठिंबा देण्यासाठीही राजधानी तेहरानसह अनेक शहरांत मोर्चे निघाले.

माशा अमिनी या २२ वर्षीय तरुणीचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे इराणमध्ये हिंसक आंदोलन सुरू आहे. हिजाब नीट घातला नसल्याचा आरोप करत संस्कृतिरक्षक पोलिसां’नी तिला अटक केली होती.