Iran Underground Missile-City Video : इराणने गेल्या आठवड्यात जमिनीखाली उभारलेल्या इमारतीमध्ये ठेवण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांची साठा जगाला दाखवून दिला आहे. यामध्ये त्यांच्याकडे असलेल्या सर्वात शक्तिशाली शस्त्रांपैकी काही क्षेपणास्त्रे इराणने उघड केली आहेत. दरम्यान इराणच्या या भूमिगत ‘मिसाईल सिटी’चा व्हिडीओ समोर आल्यानंर हा एक प्रकारे इस्त्रायल आणि अमेरिका यांना इशारा असल्याचे मानले जात आहे.
सशस्त्र दलांचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद हुसेन बघेरी आणि आयआरजीसी एरोस्पेस फोर्सचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल अमीर अली हाजीजादेह हे या ‘मिसाईल सिटी’ची पाहणी करतानाचे व्हिडीओ फुटेज इराणच्या सरकारी वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले आहे.
या व्हिडीओ फुटेजमध्ये अनेक शक्तिशाली क्षेपणास्त्र दिसून येत आहेत. ज्यामध्ये खैबर शेकान (९०० मैल रेंज) हज कासिम (८५० मैल), घद्र-एच (१,२४० मैल), सेज्जिल (१,५५० मैल) आणि इमाद (१,०५० मैल) याच्यासह पावेह लँड अटॅक क्रूझ क्षेपणास्त्र यांचा देखील समावेश आहे. ही क्षेपणास्त्रे गेल्या काही दिवसात इस्त्राइलवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये वापरण्यात आल्याचे बोलले जाते.

या भेटीदरम्यान काढण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये जनरल बघेरी हे जमिनीवर काढण्यात आलेला इस्त्राइलचा झेंडा पायदळी तुडवताना दिसत आहेत. यावेळी ते म्हणाले की, “इराणची आर्यन फिस्ट ही पूर्वीपेक्षा खूप शक्तिशाली- ट्रू प्रॉमिस I पेक्षा दहापट मजबूत आहे.” तसेच एप्रिल २०२३ मध्ये ऑपरेशन ‘ट्रू प्रॉमिस’ अंतर्गत इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा संदर्भ देत बघेरी यांनी मोठी घोषणा देखील केली. “ऑपरेशन ट्रू प्रॉमिस २ च्या वेळी तैनात केलेल्या लष्करी शक्तीपेक्षा दहा पट क्षमता (लष्करी) उभी करण्यासाठी आवश्यक सर्वा मोजमापे तयार करण्यात आली आहेत,” असेही ते म्हणाले.

इराणने मिसाइल सीटी उघड केल्याने अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणाव शि‍गेला पोहचला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच इराणाला नवीन अणु कराराला दोन महिन्यात मान्यता द्या अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहा असा इशारा दिला आहे. अमेरिकेने इराणला एका अर्थाने लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे.

तर इराणने अमेरिकेची ही मागणी फेटाळली आहे, तसेच क्षेपणास्त्रे आणि अणुकार्यक्रमाबाबत वाटाघाटी होऊ शकत नाहीत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी ट्रम्प यांचा हस्तक्षेप फेटाळून लावला आहे. तर दुसरीकडे येमेनमध्ये इराणचा पाठिंबा असलेल्या हुथी सैन्यावर अमेरिकेचे हवाई हल्ले वाढले आहेत, तसेच वॉशिंग्टनने या हल्ल्यांसाठी तेहरानला थेट जबाबदार धरले आहे.

जमिनीच्या खाली असलेली ही फॅसिलीटी इराणाच्या गुप्तपणे लष्करी पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या धोरणाचा भाग आहे. २०२० मध्ये इराणने बॅलेस्टीक क्षेपणास्त्रे आणि जमिनीखालून वाहतुकीसाठीचे बोगदे उघड केले होते. त्यानंतर तीन वर्षांनी लढाऊ विमानांच्या संरक्षणासाठी उभारलेले दुसरे एक कॉम्प्लेक्स देखील समोर आले होते.