Donald Trump Assassination Attempt: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीचा प्रचार करत असताना त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. ट्रम्प इराणचे लक्ष्य असल्याचे वारंवार बोलले जात होते. आता याबाबत खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या सल्लागारांना मंगळवारी निर्देश दिले की, जर इराणने माझी हत्या केली, तर त्यांना समूळ नष्ट करा. इराणवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी स्वाक्षरी केली, यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी वरील विधान केले.
निवडणुकीच्या काळात ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणने रचला होता असा आरोप नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने केला होता. फरहाद शकेरी (५१) या स्थलांतरीत नागरिकाने ट्रम्प यांच्यावर पाळत ठेवून त्यांची हत्या करण्यासाठी इराणी अधिकऱ्यांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. शकेरी सध्या इराणमध्ये आहे.

इराणविरोधात कडक निर्बंध

इराणची आर्थिक नाकेबंदी करण्याच्या आदेशावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. त्यांनी इराणविरोधात यापुढे कडक धोरण अवलंबले जाणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. या निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी इराणच्या इंधन निर्यातीला लक्ष्य केले आहे. इराणने अण्वस्त्र तयार करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर हे निर्बंध लादणे गरजेचे असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

२०२० मध्ये जेव्हा ट्रम्प यांनी इराणी जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येला मान्यता दिली, तेव्हा अमेरिका आणि इराणमधील वाढला होता. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प हे इराणच्या निशाण्यावर होते. २०२४ साली निवडणुकीचा प्रचार करत असताना ट्रम्प यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. पेन्सिलवेनिया येथे झालेल्या जाहीर सभेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. यावेळी त्यांच्या कानाजवळून गोळी गेली होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ट्रम्प यांना मारण्याचा इराणचा डाव अमेरिकेने उधळून लावल्याचे न्याय विभागाने म्हटले होते.

Story img Loader