Iran Strike on Israel After US Election 2024 : पश्चिम आशियामध्ये प्रचंड तणावाची स्थिती असताना ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याचे संकेत मिळत आहेत. इराणच्या तीन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी इस्रायलवर हल्ला करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानाची माहिती खामेनी यांनी गेल्या आठवड्यात देण्यात आली होती. ऑक्टोबर १ रोजी इराणनं इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्राला प्रत्युत्तर देताना इस्रायलनं इराणच्या लष्करी ठाण्यांना अचूक लक्ष्य केले होते. जर याकडे दुर्लक्ष केलं तर इस्रायलविरोधात पराभव मान्य केल्यासारखे होईल असे खामेनी म्हणाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या आठवड्यातील या हल्ल्या-प्रतिहल्ल्यानंतर अमेरिकेसह अन्य देशांनी इस्रायल व इराण या दोन्ही देशांना आता पुन्हा हल्ले करू नका अशी विनंती केली होती. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी, आत्तापर्यंत दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेले हल्ले शेवटचे ठरावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

अमेरिकेतील निवडणुकांनंतर इराण हल्ला करू शकते

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुका ५ नोव्हेंबर रोजी होणार असून त्यानंतर इराण इस्रायलवर आक्रमण करण्याची शक्यता असल्याचे वृत्त इराणच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने न्यू यॉर्क टाइम्सने दिले आहे. यापूर्वी खामेनी यांचे अत्यंत नजीकचे सहकारी मोहम्मद गोलपायेगनी यांनी इस्रायलला पश्चात्ताप होईल असे प्रत्युत्तर मिळेल असा इशारा दिला होता. “आमच्या देशातील काही भागांवर इस्रायलने केलेले हल्ले ही आततायी चाल होती. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण या हल्ल्यांना अत्यंत कठोर नी पश्चात्ताप करायला लावेल असा प्रतिसाद देईल,” या शब्दांत गोलपायगेनी यांनी तस्निम न्यूज एजन्सीकडे प्रतिक्रिया दिली होती.

इस्रायलच्या हल्ल्याच्या प्रयत्नांना इराणच्या हवाई दलाने चांगलेच थोपवले आणि अत्यंत कमी प्रमाणात इराणचे नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला. इस्रायलच्या या हल्ल्यानंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे होसेन सलामी यांनी इस्रायलनं घोडचूक केली असून त्यांनी विचारदेखील केला नसेल अशी इराणची प्रतिक्रिया असेल असे म्हटले होते. काही क्षेपणास्र डागली की या प्रदेशातला समतोल बिघडेल असा जर ज्यू राष्ट्राचा विश्वास असेल तर तो अनाठायी आहे असेही सलामी म्हणाले.

दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना बिंजामिन नेत्यानाहू यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले की इराणला अण्वस्रसज्ज होऊ न देणे हे इस्रायलचं मुख्य लक्ष्य होतं नी अजूनही आहे. इराणमध्ये आम्ही कधी नव्हे एवढा हस्तक्षेप करू शकतो हे इराणच्या सत्ताधाऱ्यांच्या अजून लक्षात आलेलं दिसत नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iran would be strike on israel after us election 2024 khemani order sgk