पोलिसांच्या मारहाणीत महसा अमिनीचा मृत्यूनंतर पेटलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाची धग इराणमध्ये अजुनही कायम आहे. सार्वजनिकरित्या हिजाब हटवून व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर इराणमधील प्रसिद्ध अभिनेत्री हेंगामेह गाझियानीला पोलिसांनी अटक केली आहे. हिजाबविरोधी आंदोलनाला समर्थन देण्यासह विरोधी माध्यमांशी संवाद साधल्यानं गाझियानीवर ही कारवाई करण्यात आली आहे, असे वृत्त ‘आयआरएनए’ या वृत्त संस्थेनं दिलं आहे.
५२ वर्षीय या अभिनेत्रीनं शनिवारी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘ही माझी शेवटची पोस्ट ठरू शकते’ असं कॅप्शन या पोस्टला गाझियानीनं दिलं आहे. ही पोस्ट करण्यापूर्वी पोलिसांनी तिला समन्स बजावला होता. “या क्षणापासून माझ्यासोबत जे काही घडेल, ते नेहमीप्रमाणेच जाणून घ्या. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी इराणी जनतेच्या सोबत असेल”, असं या पोस्टमध्ये अभिनेत्रीनं म्हटलं आहे.
उर्वशी रौतेलाने इराणमधील महिलांसाठी कापले केस, पोस्ट शेअर करत म्हणाली “हिजाबविरोधी…”
इराणमधील एका बाजारात हिजाबशिवाय व्हिडीओ चित्रीत करत गाझीयानीनं हिजाबविरोधी आंदोलनाला समर्थन दर्शवले आहे. मागे वळून मोकळे केस बांधताना या व्हिडीओत गाझीयानी दिसत आहे. गेल्या आठवड्यात केलेल्या एका पोस्टमध्ये तिने इराण सरकारला ‘चाईल्ड किलर’ म्हटलं आहे. सरकारने ५० हून अधिक लहान मुलांचा खून केल्याचा आरोप तिनं या पोस्टमध्ये केला आहे.
Anti Hijab Protests: हे तर अमेरिका, इस्रायलचं षडयंत्र; इराणच्या सर्वोच्च नेत्याचा दावा
हिजाबशिवाय सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्याप्रकरणी या महिन्याच्या सुरवातीला तरानेह अलिदुस्ती या इराणी अभिनेत्रीलाही अटक करण्यात आली आहे. इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिजाबला विरोध केला जात आहे. महसा अमिनी या तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमधील महिलांनी तेथील सरकार आणि पोलिसांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. महसा अमिनीला इराणच्या पोलिसांनी फक्त हिजाब नीट परिधान केला नाही या कारणाने अटक केली होती. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असताना तिला मारहाण करण्यात आली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला होता.