महसा अमिनीचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर पेटलेल्या आंदोलनाची धग इराणमध्ये अजुनही कायम आहे. हे आंदोलन क्रुररित्या हाताळणाऱ्या सरकारविरोधात इराणमध्ये रोष आहे. इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या भाचीने घेतलेल्या भूमिकेनं सगळ्या जगाचं लक्षं वेधल आहे. इराणमधील प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या फरीदेह मोरादखानी यांनी जगातील देशांना तेहरानसोबत असलेले सर्व संबंध तोडण्याचे आवाहन केले आहे. व्यवसायाने इंजिनियर असलेल्या फरीदेह यांनी याबाबत व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
फरीदेह यांचे वडील इराणमध्ये विरोधी पक्षनेते होते. त्यांनी खामेनींच्या बहिणीशी विवाह केला होता. सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या फरीदेह यांना २३ नोव्हेंबरला पोलिसांनी अटक केली आहे, असे वृत्त ‘हराना’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. फरीदेह यांनी आत्तापर्यंत १५ वर्षांचा तुरुंगवास भोगल्याची माहितीही या वृत्त संस्थेनं दिली आहे.
“या खुनी आणि बालहत्या करणाऱ्या सरकारला समर्थन करणे थांबवा, असं नागरिकांनी त्यांच्या देशातील सरकारला आवाहन करावं”, असं फरीदेह यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे. “ही राजवट आपल्या कोणत्याही धार्मिक तत्त्वाशी एकनिष्ठ नाही. शक्ती आणि सत्ता टिकवून ठेवण्याशिवाय कोणतेही नियम या सरकारला माहित नाहीत”, अशी टीका त्यांनी केली आहे. इराणमध्ये भडकलेल्या हिंसक आंदोलनात आत्तापर्यंत ४५० आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. यात ६३ अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे वृत्त ‘हराना’ने दिले आहे. दरम्यान, १८ हजारांहून अधिक आंदोलनकर्त्यांना इराण सरकारने अटक केली आहे.
Anti Hijab Protests: हे तर अमेरिका, इस्रायलचं षडयंत्र; इराणच्या सर्वोच्च नेत्याचा दावा
महसा अमिनीच्या मृत्यूनंतर पेटलं आंदोलन
महसा अमिनी या तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमधील महिलांनी तेथील सरकार आणि पोलिसांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. महसा अमिनीला इराणच्या पोलिसांनी फक्त हिजाब नीट परिधान केला नाही या कारणाने अटक केली होती. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असताना तिला मारहाण करण्यात आली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला होता.