Iranian woman protests : इराणमध्ये महिलांच्या कपड्यांबद्दलच्या कठोर कायद्यांविरोधात एका महिलेचे आंदोलन सध्या चर्चेचा विषय बनले आहे. इराणमधील एका महिलेचा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये ही महिला अंगावरील सर्व कपडे काढून नग्न अवस्थेत पोलिसांच्या वाहनावर जाऊन बसल्याचे पाहायला मिळत आहे. इराण इस्लामिक राष्ट्र असून येथे पूर्ण शरीर न झाकणाऱ्या महिलांना कठोर शिक्षा दिली जाते याविरोधात ही महिला आंदोलन करत असल्याचे सांगितले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यामध्ये इराणच्या मशाद या शहरात ही महिला पोलिसांच्या गाडीच्या बोनेटवर उभी राहून पोलिसांवर ओरडताना दिसत आहे. हा व्हिडीओ इराणी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मसीह अलिनेजाद (Masih Alinejad) यांनी शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अखेरीस एक सशस्त्र पुरूष अधिकारी महिलेला पकडण्यास कचरत असल्याचे दिसून येते. ही महिला हातवारे करत ओरडत त्या अधिकार्‍याचा विरोध करताना दिसते.

द सनने दिलेल्या रिपोर्टनुसार, महिलेच्या पतीने सांगितले की, या घटनेनंतर तिला वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. महिलेची कृती ही इराणमध्ये महिलांच्या कपड्यांवर वाढत चाललेल्या बंधनांविरोधात आंदोलन म्हणून पाहिली जात आहे. डिसेंबरमध्ये इराणच्या कायदेमंडळाने केस, हात किंवा पाय दाखवणार्‍या महिलांना कठोर शिक्षा करण्याचा प्रस्ताव असलेला नवीन कायदा मंजूर केला आहे.

यावर्षी जानेवारीमध्ये तेहरानच्या मेहराबाद विमानतळानर हिजाबबद्दल विचारणा केल्यानंतर एका महिलेने स्वत:चे डोके झाकण्यासाठी एका कर्मचार्‍याची पगडी काढून घेतली होती. हा प्रकार देखील व्हिडीओमध्ये कैद झाला होता.

तसेच नोव्हेंबर २०२४ मध्ये तेहरानच्या आझाद विद्यापीठातील एका विद्यार्थीनीचा तिच्या अंतर्वस्त्रांमधील व्हिडीओ समोर आला होता, तिला नंतर बळजबरीने वाहनात बसवण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी बंधनकारक असलेला हेडस्कार्फ न घालण्यावरून झालेल्या वादावेळी सुरक्षा रक्षकांनी तिचे कपडे फाडल्याच्या विरोधात ती निषेध करत होती, यासंबंधीचे वृत्त इराण इंटरनॅशनलने दिले होते.

१९७९ च्या इराणमध्ये झालेल्या क्रांतीपासून महिलांचे कपडे हे वादाचा विषय आहेत. २०२२ मध्ये हिजाब उल्लंघनाच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्यानंतर महसा अमिनी(Mahsa Amini) च्या मृत्यूनंतर तणाव वाढला होता, ज्यामुळे देशभरात निदर्शने झाली होती. या आंदोलनावेळी सुरक्षा दलांनी ५५० हून अधिक लोकांना ठार मारले होते तर हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आले होते..