इराकमध्ये शियापंथीय मुस्लीम यात्रेकरूंना सुन्नी पंथाच्या घुसखोरांनी सलग दुसऱ्या दिवशीही लक्ष्य केले असून शुक्रवारी त्यांच्यावर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यात आतापर्यंत २६ जण ठार झाले आहेत. गुरुवारपासून करण्यात आलेल्या हल्ल्यात एकूण ६० जण ठार झाले आहेत.
बगदादच्या उत्तरेकडील दुजैल येथे दोन गाडय़ांमध्ये बॉम्बस्फोट झाला. समारा शहराकडील धर्मस्थळाकडे शियापंथीय जात असताना हे स्फोट झाले. त्यामध्ये ११ यात्रेकरू ठार झाले तर ६० जण जखमी झाले, असे सलाहुद्दीन प्रांताचे आरोग्य संचालक रईद इब्राहीम यांनी सांगितले.
बॉम्बस्फोटांचा कानठळ्या बसविणारा आवाज झाला आणि आम्ही बाहेर येऊन पाहिले तेव्हा दोन गाडय़ा जळत होत्या आणि अनेक मृतदेह जमिनीवर पडले होते. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांना आगी लागल्या होत्या, असे दुजैल टपाल खात्यात काम करणारे नसीर हादी यांनी सांगितले.
या हल्ल्यात शियापंथीयांच्या एका मशिदीचे आणि दुकानांच्या काचा फुटल्याचे चित्र एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. इराकमध्ये २००६ मध्ये सुवर्णघुमटाच्या मशिदीवर अल-कायदाने हल्ला केला होता त्यानंतर शिया आणि सुन्नी या दोन पंथांमध्ये सूडाचे रक्तरंजित नाटय़ सुरू झाले आहे.
सदर हिंसाचारात हजारो इराकी नागरिक मृत्युमुखी पडले असून देशात यादवी माजली आहे. शियापंथीयांचे धार्मिक शहर असलेल्या करबाला येथे परदेशी यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करण्यात आल्यानंतर दुजैलमध्ये हल्ला करण्यात आला. या बसमध्ये अफगाणिस्तानातील पर्यटक होते.
बगदादच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या कासीम शहरात एका गाडीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यामध्ये सात जण ठार आणि २८ जण जखमी झाले.

Story img Loader