इराकमध्ये सुन्नी दहशतवाद्यांचे हल्लासत्र सुरूच असून त्यांना रोखण्यासाठी इराकी सैन्यदल जिकिरीने प्रयत्न करत आहेत. आता रशियाही इराकच्या मदतीला धावली असून, दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी खास सुखोई लढाऊ विमाने रशियाने इराकला पुरवली आहेत.
सुन्नी दहशतवाद्यांनी सध्या सद्दाम हुसेन यांचे मूळ गाव असलेल्या तिक्रीत येथे हल्ला केला असून, सैन्यदल तिथे त्यांच्याशी निकराने लढा देत आहे. रशियाने दिलेल्या सुखोई विमानांनी रविवारी तिक्रीत शहरावर हवाई हल्ले केले असून दहशतवाद्यांचे हल्ले मोडून काढण्यासाठी इराकी सैन्यदलाला मदत केली.
इराकमध्ये दहशतवाद्यांचे वर्चस्व वाढत असल्याने जागतिक नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दहशतवाद्यांचा बीमोड करून इराकमध्ये शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात यावा, अशी भूमिका सर्व नेत्यांनी घेतली आहे. इराकी सैन्यदलानेही त्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, अनेक देशांनीही त्यांना मदत देऊ केली आहे.
इराकमधील या संकटाचे निराकरण करण्यासाठी राजनैतिक तोडगा काढला पाहिजे, अशी इच्छा इराकचे पंतप्रधान नुरी अल-मलिकी यांनी व्यक्त केली. तिक्रीत येथे दहशतवाद्यांचा बीमोड करण्यात सैन्यदलाला यश येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader