सुन्नी दहशतवाद्यांनी इराकमधील बहुतांश भागात मारलेली मगरमिठी सोडवायचीच, असा निर्धार शिया मुस्लिमांनी केला आहे. यासाठी देशात सर्वसमावेशक सरकारचा आगामी प्रमुख ठरवण्यासाठी सर्व राजकीय गटांची एक बैठक शुक्रवारी शिया धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली बोलावण्यात आली. पुढील आठवडय़ात नवी संसद अस्तित्वात येईल. यासाठी सर्व संघटना आणि राजकीय पक्षांनी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन धर्मगुरूंनी केले आहे.  
इराणी वंशाचे मुख्य अयातोल्लाह अली अल सिस्तानी यांचीही तीच इच्छा आहे. येत्या मंगळवारी नवीन संसद सदस्य आणि अध्यक्ष निवडण्यासाठी राजकीय गटांनी एकत्र येण्यासाठी सर्व राजकीय मतभेद बाजूला सारण्याचे आवाहन केले. पवित्र शहर करबाला येथे ‘जुम्मे की नमाज’च्या प्रसंगी सिस्तानी यांचे प्रतिनिधी अब्दुल महदी अल करबालाई यांनी शिया बांधवांना आवाहन करताना सद्यस्थितीवर उपाय ठरू पाहणारा प्रभावी राजकीय पर्याय निवडण्याची वेळ येऊन ठेपल्याचे स्पष्ट केले.
इराकमधील राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच सांस्कृतिक जीवनाला मोठा धोका निर्माण झाला आहे आणि अशा आणीबाणीच्या काळात सक्षम सरकार निवडणे ही सर्वात मोठी जबाबदारी नागरिकांवर असल्याचे प्रतिपादन धर्मगुरूंनी भाषणातून केले. ‘आयएसआयएल’ने अल कायदाला हाताशी धरून इराकमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर आपला ताबा मिळवला आहे.
मोसुल आणि कधी काळी सद्दाम हुसेन ज्या शहरात बसून लष्करी डावपेच लढत होते, त्या तिकरीत शहरावरही सुन्नी दहशतवाद्यांनी कब्जा मिळवला आहे.
अशात इराकच्या पाठीशी उभ्या असलेल्या अमेरिकेने सत्तारूढ मलिकी सरकारवर दबाव वाढत ठेवला आहे. वाढवला आहे. त्यांच्या मते नवीन सरकार अस्तित्वात आल्यास दहशतवाद्यांना मिळणारी रसद कापून काढता येईल.

Story img Loader