इराकमध्ये उद्भवलेल्या अराजकसदृश परिस्थितीमुळे तेथे अडकून पडलेल्या ४६ भारतीय परिचारिकांच्या सुटकेचा मार्ग अवघड असल्याचेच निष्पन्न होत आहे. ‘आयएसआयएस’ या दहशतवाद्यांच्या संघटनेने सर्व रुग्णसेविकांना अज्ञातस्थळी हलविले आहे. त्यातच इराकमधील संघर्षप्रवण वस्त्यांमधून प्रवास करीत असताना झालेल्या हल्ल्यांमध्ये काही परिचारिका ‘किरकोळ जखमी’ झाल्या आहेत.
भारतीय परिचारिका असलेला इराकमधील भाग सध्या तेथील सरकारच्या नियंत्रणाखाली नाही. तसेच अनेक प्रयत्न करूनही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीदेखील दुर्दैवी परिचारिकांशी थेट संपर्क साधू शकलेले नाहीत. मात्र इराकमधील राजदूतावास या परिचारिकांच्या ‘पुरेसा’ संपर्कात आहे आणि त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जात असताना त्या ‘सुरक्षित’ आहेत, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार खात्याच्या प्रवक्त्याने दिली.
तिकरीत येथील रुग्णालयामधून या परिचारिकांना अज्ञात स्थळी हलविण्यात आले. मात्र त्यांना स्वखुशीने नव्हे तर सक्तीने अन्यत्र हलविले गेल्याचे संकेत सरकारी अधिकाऱ्यांनी दिले. ‘जेव्हा परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते तेव्हा आपल्या संरक्षणार्थ परिस्थितीचे आदेश पाळावेच लागतात’, अशा शब्दांत परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
इराकमध्ये रण पेटलेल्या भागात सुमारे १०० भारतीय व्यक्ती अडकून पडल्या आहेत. मात्र त्यांचा नेमका आकडा सांगणे कठीण आहे. ४६ भारतीय परिचारिका आणि ३९ अन्य भारतीयांचा गट सध्या दहशतवाद्यांच्या ‘ताब्यात’ असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र हे सर्वच जण सुरक्षित असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भारताबरोबरच इतरही देशांचे प्रतिनिधी आपापल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील असल्याची तसेच तेथे मदतकार्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था सक्रिय असल्याची माहितीही सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader