इराक तसेच सीरियामधील नव्याने जिंकलेल्या प्रदेशावर इस्लामिक राष्ट्र स्थापण्यासाठी पुकारलेल्या लढाईत जगातील सर्व मुस्लिमांना सामील होण्याचे आवाहन बुधवारी ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हण्ट’ (आयएसआयएल) या दहशतवादी संघटनेने केले. या संघटनेने अत्यंत आक्रमक आणि मानवी बॉम्बच्या साह्य़ाने उत्तर इराक आणि सीरियातील बराचसा भाग आपल्या ताब्यात घेतला आहे. ‘आयएसआयएल’चा संस्थापक अबु बकर अल बगदादी याने आपल्या १९ मिनिटांच्या ध्वनिचित्रफितीतील भाषणात हे आवाहन केले आहे. ‘आयएसआयएल’ने इराक आणि सीरियातील काही भागांवर एकतर्फी विजय मिळवल्यानंतर बगदादी याने स्वतला खलिफा म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे जिंकून घेतलेल्या सर्व भागांवर इस्लाम राष्ट्राची स्थापना करण्यासाठी जगातील सर्व मुस्लिमांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे या भाषणात म्हटले आहे.
 बगदादीच्या भाषणात जागतिक महत्त्वाकांक्षा उघड झाली आहे आणि त्याला जगातील मुस्लीमधर्मीयांचा नेता बनायचे आहे. यासाठी त्याला अल कायदाचा प्रमुख अयमन अल जवाहिरी याचा प्रभाव अमान्य केला आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या इस्लामिक राष्ट्रात कोणालाही सामील होता येईल. मग तो कोणत्या देशाचा आहे, हे विचारात घेतले जाणार नाही. जो या राष्ट्रात सामील होईल, त्याला सन्मान, सामथ्र्य, हक्क आणि नेतृत्व मिळेल, याची मी हमी देतो, असे बगदादी याने स्पष्ट केले आहे. या राष्ट्रात काळा-गोरा, पूर्व वा पश्चिमेचा किंवा अरब आणि अरब नसलेला असा भेदभाव केला जाणार नाही. इथे सर्व बंधुभावाने वागतील, असे स्पष्ट केले.
नव्या सरकारसाठी दबाव  
नव्या सरकारच्या निर्मितीच्या मागणीवरून इराकच्या संसदेचे पहिलेच अधिवेशन बुधवारी प्रचंड गोंधळात संपले. सुन्नी दहशतवाद्यांकडून सातत्याने होणारे हल्ले रोखण्यासाठी इराक नेतृत्वावर उत्तरोत्तर दबाव वाढत चालला आहे. इराक आणि सीरियाच्या सीमेवरील बहुतांश भाग सुन्नी दहशतवाद्यांनी ताब्यात घेतला आहे आणि त्यांच्या अमर्याद दहशतवादी कारवाया लक्षात घेता संपूर्ण इराकच पुन्हा विच्छिन्न होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

Story img Loader