ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची कबुली
इराकचे सर्वेसर्वा सद्दाम हुसेन यांना हटवण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनच्या नेतृत्वाखाली २००३ साली केलेल्या लष्करी कारवाईमुळे इसिस या दहशतवादी संघटनेचा उदय आणि विस्तार होण्यास मदत झाली, अशी कबुली ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी दिली.
या प्रकरणी त्यांनी पूर्णपणे माफी मात्र मागितली नाही. सद्दाम हुसेन यांना पदावरून हटवण्यात त्यांना गैर काही वाटले नाही. मात्र हे युद्ध सुरू करण्यापूर्वी इराकमध्ये मोठय़ा प्रमाणात महाविध्वंसक अस्त्रे असल्याची जी गुप्त माहिती मिळाली होती ती चुकीची ठरल्याबद्दल त्यांनी कबुली दिली. सद्दामने आपल्याच कुर्द बंडखोरांविरुद्ध रासायनिक अस्त्रे वापरली होती. मात्र इराकमध्ये ज्या प्रमाणात ही अस्त्रे असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती त्या प्रमाणात तेथे ती नव्हती, असे ब्लेअर यांनी सांगितले. याच आधारावर अमेरिका आणि ब्रिटनने इराकवर हल्ला केला होता. याशिवाय युद्धाच्या नियोजनातही काही चुका झाल्याची कबुली ब्लेअर यांनी दिली. १९९७ ते २००७ या काळात ब्लेअर दोन वेळा ब्रिटनचे पंतप्रधान होते.
सद्दामना २००३ साली हटवण्यात सहभागी असलेले आजही तेथील परिस्थितीसाठी जबाबदार आहेत. मात्र त्याशिवाय २०११ साली झालेल्या अरब क्रांतीचाही त्या घटनांवर परिणाम झाला असेल आणि इसिस प्रथम इराकमध्ये नाही, तर सीरियात सक्रिय झाली, या बाबींकडेही लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
या प्रकरणातील जॉन चिल्कॉट चौकशी समितीचा अहवाल आता प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यात चुकीच्या गुप्त माहितीवर विसंबून इराकवर हल्ला केल्याबद्दल ठपका ठेवला जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच ब्लेअर यांना आता ही उपरती होत असल्याची टीका ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी केली आहे.

Story img Loader