कोलकाता राजधानीत देण्यात आलेल्या जेवणात झुरळ सापडल्यामुळे ‘आयआरसीटीसी’ (रेल्वेची खानपान सेवा)ला रेल्वेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आह़े त्याबरोबरच अन्यही नऊ खानपान सेवा कंपन्यांवर निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविल्याबद्दल एकूण ११.५० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आह़े
रेल्वेच्या विविध गाडय़ांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाचा दर्जा तपासण्यासाठी आम्ही विशेष मोहीम राबविली होती़ यात काही गाडय़ांमध्ये निकृष्ट दर्जाचे खाद्य पुरविण्यात येत असल्याचे लक्षात आल़े त्यामुळे संबंधित कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे, असे रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितल़े आयआरसीटीसीसह आरके असोसिएट्स, सनशाइन केटर्स, सत्यम केटर्स, ब्रंदावन फूड प्रॉडक्ट्स यांना दंड करण्यात आला आहे.
कोलकाता राजधानी एक्स्प्रेसमध्ये अन्नात झुरळ सापडल्याची घटना २३ जुलैला घडली. त्यावर आयआरसीटीसीला १ लाख रुपये दंड करण्यात आला. तसेच १३ गाडय़ांमध्ये वाईट अन्न पुरवल्याचे दिसून आले. पश्चिम एक्स्प्रेस, पुष्पक एक्सप्रेस, मोतीहारी एक्स्प्रेस, शिवगंगा एक्स्प्रेस, गोल्डन टेम्पल मेल, नेत्रावती एक्स्प्रेस, पंजाब मेल, हावडा-अमृतसर मेल व चंडीगड शताब्दी एक्स्प्रेस या गाडय़ांमधील अन्न तपासण्यात आले. त्यातील काही गाडय़ांमध्ये शिळे अन्न सापडले असून कंत्राटदारांना ५० हजार ते १ लाखांपर्यंत दंड करण्यात आले आहेत. अशा चुका पाच वेळा आढळल्यास संबंधित कंत्राटदाराचा परवाना काढून घेतला जातो.
रेल्वेच्या नव्या योजनेनुसार, आयआरसीटीसी, एमटीआर आणि हल्दिराम आदी बडय़ा कंत्राटदारांच्या माध्यमातून आधी शिजवलेले हवाबंद अन्न रेल्वेत पुरविण्याचा प्रयत्न आह़े त्यासाठी सध्या राजधानी, दुरांतो, शताब्दी या गाडय़ांमध्ये ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आह़े चिकन छेत्तीनाड, हैदराबादी बिर्याणी, सांबार भात आणि राजमा भात यांसारखे लज्जतदार पदार्थ सध्या या योजनेअंतर्गत पुरविण्यात येत आहेत़
रेल्वेतील खाद्यात झुरळ सापडले
कोलकाता राजधानीत देण्यात आलेल्या जेवणात झुरळ सापडल्यामुळे ‘आयआरसीटीसी’ (रेल्वेची खानपान सेवा)ला रेल्वेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आह़े
First published on: 04-08-2014 at 12:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc among nine caterers fined by railways for bad food