आपल्याला हवी असणारी गाडी नेमकी किती वाजता येणार किंवा जाणार तसेच गाडी कोणत्या ठिकाणी आहे, याची बिनचूक माहिती प्रवाशांना उपलब्ध व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने नवीन ‘मोबाइल अॅप्स’ विकसित केले आहे. या अॅप्समुळे प्रवाशांना आपल्या गाडीशी संबंधित माहिती क्षणार्धात मोबाइलवर मिळणार आहे.
रेल्वेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने हे नवे अॅप्स विकसित केले असून गाडय़ांच्या वेळापत्रकाव्यतिरिक्त इतरही माहिती तात्काळ उपलब्ध होणार असल्याचे, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मायक्रोसॉफ्टच्या मदतीने हे अॅप्स विंडोज ८ ची सुविधा असणाऱ्या मोबाइल आणि संगणकावर सुरुवातीला वापरता येईल. त्यानंतर इतर मोबाइलसाठीही हे अॅप्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
याआधी रेल्वे गाडय़ांसंबंधी अथवा आरक्षणासंबंधी माहिती मिळविण्यासाठी प्रवासी १३९ हा हेल्पलाइन क्रमांक, रेल्वेचे संकेतस्थळ (www.trainenquiry.com) रेल्वे स्थानकांवरील फलक, विचारपूस केंद्र आदींचा वापर केला जातो. त्यात आता मोबाइल अॅप्सची भर पडली आहे.
रेल्वेच्या नव्या अॅप्समुळे प्रवाशांना आपल्या गाडीची नेमकी स्थिती कळणार आहे. सध्या गाडी कुठे आहे, तिचे वेळापत्रक तसेच कोणत्या रेल्वेस्थानकांवर ती कोणत्या वेळेला असेल आणि तेथून किती वाजता सुटणार याची माहिती मिळणार आहे. याशिवाय रद्द झालेल्या गाडय़ा, इतर मार्गावर वळवलेल्या गाडय़ांची माहितीही उपलब्ध होणार आहे.

Story img Loader