आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेल्वे तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना आता नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही, तर प्रवाशांना सवलतीच्या दरात विमानाने इच्छित स्थळी पाठविण्याची योजना आयआरसीटीसीकडून आखण्यात आली आहे. यासाठी आयआरसीटीसीने दोन विमान कंपन्यांशी करारदेखील केले आहेत.
आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर रेल्वेचे तिकीट आरक्षित केल्यानंतर प्रवासाच्यावेळेपर्यंत जर ते प्रतिक्षा यादीतच राहिले, तर संबंधित प्रवाशांना या सुविधाचा वापर करता येईल. प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना आयआरसीटीसीकडून एक ई-मेल पाठविण्यात येईल. यामध्ये विमानाचे तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना air.irctc.co.in या संकेतस्थळावर जावे लागेल. तिथे लॉग इन केल्यावर रेल्वेच्या प्रतिक्षा यादीतील आपले नाव निवडल्यानंतर जर संबंधित शहरामध्ये विमानसेवा उपलब्ध असेल, तर त्याबद्दलची माहिती तिथे देण्यात येईल. संबंधित विमानाचे तिकीट उपलब्ध असल्यास प्रवासी लगेचच तिथे आरक्षण करू शकतात. या पद्धतीने विमानाचे तिकीट आरक्षित केल्यास संबंधित प्रवाशाला विमानाच्या तिकीटाच्या शुल्कामध्ये ३० ते ४० टक्के सवलत मिळेल. मात्र, प्रवाशांना विमानाच्या तिकीटाचे पैसे नव्याने भरावे लागणार आहेत. रेल्वे तिकीटाच्या परताव्याच्या रकमेच्या माध्यमातून विमानाचे तिकीट काढता येणार नाही. रेल्वे तिकीटाच्या परताव्यासाठी प्रवाशांना नेहमीप्रमाणे ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. प्रवासाच्या तीन दिवस अगोदर रेल्वेचे तिकीट आरक्षित करणाऱया प्रवाशांनाच या सुविधेचा वापर करता येणार आहे.

Story img Loader