ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना आता आयआरसीटीसी सामानाचा विमा ही नवी सेवा देणार आहे. त्याअंतर्गत ग्राहकाला ई-तिकीट नोंदवताच ही सेवा लागू होणार आहे. त्यानुसार एखादा प्रवासी सामान हरवल्यास विमा रक्कम मागू शकतो . लॅपटॉप, मोबाइल फोन व मौल्यवान वस्तू या त्या विमा संरक्षणात येतात.
प्रवासी विम्याचीच ही योजना असून त्यासाठी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीशी भागीदारी करण्यात येत आहे. त्यासाठीचा प्रीमियम हा प्रवासाचे अंतर व कुठल्या वर्गातून तुम्ही प्रवास करीत आहात यावर अवलंबून असणार आहे.
आयआरसीटीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की या कंपनीशी करार झाल्यानंतर ई-तिकीट काढणाऱ्यांना ही विमा सेवा लागू राहील. ही विमा सेवा घ्यायची की नाही हे प्रवाशांवर अवलंबून राहील ती अनिवार्य नसेल. प्रवासात रुग्णालयात दाखल करावे लागल्यास त्यालाही विमा योजना लागू करण्याचा प्रस्ताव आहे.
*एकूण रोजचे रेल्वे प्रवासी २० लाख
*रोजचे ई-तिकीटधारक – ५२ टक्के
*दागिने, मोबाइल, लॅपटॉप व मौल्यवान वस्तूंसाठी विमा संरक्षण
*न्यू इंडिया अॅश्युरन्सशी करार करणार
*प्रवासाचे अंतर व कुठल्या वर्गातून प्रवास यावर प्रीमियम ठरणार