पीटीआय, लंडन
प्रस्थापित दडपशाही सरकारविरोधात बंडखोरी पुकारणाऱ्यांचे चिरडलेपण ‘प्रॉफेट साँग’ या कादंबरीतून दाखविणारे आयरिश लेखक पॉल लिंच यांना यंदाचे बुकर पारितोषिक जाहीर झाले. ५० हजार पौंड (६३ हजार डॉलर) अशी बुकर पारितोषिकाची रक्कम असते. लघुयादी जाहीर झाल्यानंतर गेल्या तीनेक महिन्यांपासून हा पुरस्कार कुणाला मिळेल, याचे कुतूहल वाढले होते. रविवारी पुरस्काराची घोषणा झाली.
समकालीन सामाजिक आणि राजकीय घटनांतून तयार झालेल्या वेदनांना ‘प्रॉफेट साँग’ ही कादंबरी समोर आणते, आजचे वास्तव आपल्या कथेमधून मांडते, असे बुकर निवड समितीच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. आयरिस मरडॉक, जॉन बॅनविल, रॉडी डॉयल, अॅन एनराईट यांच्यानंतर पॉल लिंच हे आर्यलडमधील पाचवे बुकर विजेते लेखक ठरले आहेत. चेतना मारू या भारतीय वंशाच्या आणि लंडनमध्ये वाढलेल्या लेखिकेची ‘वेस्टर्न लेन’ नावाची कादंबरी लघुयादीत ब्रिटनचे प्रतिनिधित्त्व करीत होती.
हेही वाचा >>>धक्कादायक! किरकोळ कारणावरुन वाद पेटला, संतापलेल्या बायकोने नवऱ्याचा कानच चावला
कादंबरीत काय? नजीकच्या भविष्यात घडणारे कथानक ‘प्रॉफेट साँग’मध्ये आले आहे. आर्यलडमधील एका कुटुंबातील चार व्यक्तींवर सरकारकडून केल्या जाणाऱ्या अत्याचाराची नोंद या कादंबरीत घेण्यात आली आहे. या कादंबरीचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात विरामचिन्हांचा वापर आणि परिच्छेद बदलाचा प्रकार दिसत नाही. सगळे संवाद एका अखंड परिच्छेदाच्या रूपात आपल्यासमोर येतात. वाचनशक्तीची ही कादंबरी परीक्षा घेते. ‘बुकरायण’ या नैमित्तिक सदरातील ‘उद्ध्वस्त करणारा राष्ट्रवाद’ या लेखातून सई केसकर यांनी या कादंबरीचा परिचय करून देताना म्हटले होते : लोक अशा कादंबऱ्या वाचतात कारण त्यांच्या आसपास, कदाचित थोडय़ा कमी तीव्रतेनं जे घडत असतं, त्याचंच प्रतिबिंब त्यांना इथं दिसतं..’
पॉल लिंच यांच्याबद्दल..
‘प्रॉफेट साँग’ ही लिंच यांची पाचवी कादंबरी असून अवघड आणि भीषण प्रसंग काव्यात्मक भाषेत मांडण्याबाबत ते ओळखले जातात. इतिहास आणि वर्तमानातील घटनांचा आधार घेऊन आलेल्या त्यांच्या आधीच्या चारही कादंबऱ्यांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत.