पौगंडावस्थेतील मुलींमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारने देशभरातील १० ते १९ या वयोगटातील १३ कोटी मुलींनी दर आठवडय़ाला लोहखनिज देणाऱ्या आयर्न फोलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या वाटायची अभिनव योजना आखली आहे. पुढील तीन महिन्यांत दर सोमवारी देशातील विद्यार्थिनींना या गोळ्यांचे वाटप होणार आहे.
रक्तातील लाल पेशींचे प्रमाण कमी होऊन रक्तक्षय वा पंडुरोगाची लागण होते. मुली व विशेषत: प्रजननक्षम वयोगटातील स्त्रियांमध्ये त्याचे प्रमाण सर्वाधिक आढळते. त्याचा परिणाम जन्माला येणाऱ्या अर्भकावरही होतो. याची दखल घेऊन सर्वप्रथम जागतिक आरोग्य संघटनेने ‘वीकली आयर्न फोलिक अ‍ॅसिड सप्लिमेन्टेशन’ (डब्ल्यूआयएफएएस) हा कार्यक्रम २००७ सालीच हाती घेतला आणि २०११ मध्ये या मोहिमेसाठीची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. हा कार्यक्रम १५ ते ४४ या प्रजननक्षम वयोगटासाठी आरोग्य संघटनेने आखला असला तरी भारताने १० ते १९ या वयोगटातील मुलींसाठी त्याला समांतर अशीच मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या संचालिका अनुराधा गुप्ता यांनी सांगितले की, या योजनेनुसार १० ते १९ या वयोगटांतील देशातील सहा कोटी शाळकरी मुलींना तसेच शाळेत जात नसलेल्या सहा ते सात कोटी मुलींना या गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. शाळेतील मुलींना माध्यान्ह भोजनानंतर या गोळ्या दिल्या जातील.
१९०० पासून भारतातील बालमृत्यूचे प्रमाण ४५ टक्क्य़ांनी घटले आहे तरीही ० ते ५ या वयोगटांतील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या चार देशांत भारताची आजही गणना होते. हे चित्र पालटण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारांतील आंतरमंत्रीय विचारविनिमय तसेच या विषयातील जागतिक व देशी तज्ज्ञ यांचा समावेश असलेली कृतीपरिषद चेन्नईत ७ फेब्रुवारीला भरत आहे. या परिषदेला युनिसेफचेही साह्य़ लाभले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Story img Loader