Reddit Viral Post: रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ४२ वर्षीय भारतीय व्यक्तीने मोठ्या प्रमाणात बचत असूनही नोकरी सोडण्याची आणि लवकर निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान या व्यक्तीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या अज्ञात व्यक्तीने त्याच्याकडे मुदत ठेवींमध्ये २.५ कोटी रुपये, कोणतेही कर्ज आणि त्याच्यावर कुटुंबातील कोणीही अवलंबून नसल्याचेही म्हटले आहे.

९ ते ५ च्या नोकरीमुळे थकवा आणि ताण

या व्यक्तीकडे बरीच संपत्ती असूनही, तो ९ ते ५ च्या नोकरीमुळे सततचा थकवा आणि ताण जाणवत असल्याचे स्पष्ट केले आहे. डोक्यावर कोणतेही कर्ज नसल्याने आणि सरासरी ५०,००० रुपयांपेक्षा कमी मासिक खर्च असल्याने, त्याची सध्याची आर्थिक स्थिती शांततापूर्ण निवृत्तीसाठी पुरेशी आहे का? असा प्रश्न त्याने रेडिटवरील इतर युजर्सना विचारला आहे.

नोकरी सोडण्यापूर्वी…

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक रेडिट युजर्सनी या व्यक्तीबाबत सहानुभूती व्यक्त केली आहे. तर, इतर अनेक युजर्नी या व्यक्तीला नोकरी सोडण्यापूर्वी पुढील नियोजन योग्य पद्धतीने करण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी इतर अनेक युजर्स म्हणाले की, सुरुवातीला लवकर निवृत्ती घेणे हे आरामदायी वाटू शकते, परंतु नंतरच्या काळात निवृत्तीचा कंटाळा आणि असंतोष निर्माण होऊ शकतो. यावेळी काही युजर्सने त्यांचे स्वतःचे अनुभव शेअर केले आणि म्हटले की, जेव्हा वेळ घालवण्यासाठी कोणत्याही अर्थपूर्ण गोष्टी नसतात तेव्हा काम न करण्याचा उत्साह लवकर कमी होतो.

Want to quit and retire.
byu/Proud-Connection1580 inpersonalfinanceindia

लवकर निवृत्ती घेण्यापेक्षा…

या व्यक्तीच्या पोस्टवर व्यक्त होताना काहींनी लिहिले की, लवकर निवृत्ती घेण्यापेक्षा छोटीशी विश्रांती किंवा लहान ब्रेक घेणे अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यांनी पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीला हा वेळ विश्रांती घेण्यासाठी, प्रवास करण्यासाठी आणि भविष्यातील पर्यायांवर विचार करण्यासाठी वापरण्याचाही सल्ला दिला आहे.

स्पष्ट उद्देश महत्त्वाचा

दरम्यान काहींनी असेही अधोरेखित केले की, आर्थिक जबाबदाऱ्यांपासून मुक्त असल्याने आयुष्यात आपोआप शांतता येत नाही. कामापासून पूर्णपणे दूर जाण्याचा निर्णय घेताना भावनिक स्पष्टता आणि स्पष्ट उद्देश असणे गरजेचे आहे. याचबरोबर या व्यक्तीला अनेक युजर्सनी पूर्णपणे निवृत्त होण्यापेक्षा फ्रीलांसकडे वळण्याचाही सल्ला दिला.