अमेरिकेला हादरवून टाकणाऱ्या बोस्टन बॉम्बहल्ल्यातील एक संशयित ठार झाला असताना आणि दुसरा गंभीर जखमी अवस्थेत अखेरचे श्वास घेत असताना या हल्लेखोरांचा या हल्ल्यामागचा नेमका हेतू काय होता आणि त्यांचा अल कायदाशी काही संबंध होता का, याचा शोध घेण्यासाठी एफबीआय जोमाने प्रयत्न करीत आहे.
पोलिसांबरोबर धुमश्चक्रीत शुक्रवारी ठार झालेला २६ वर्षीय तामेरलान सार्नाएव्ह हा गेल्या काही वर्षांत बोस्टनहून अनेकवार रशियाला गेल्याचे उघड झाले आहे. २०१२ मध्ये तो उत्तर कॉकसस पट्टय़ातील डॅजेस्टान येथे राहीला होता आणि त्या वास्तव्यातच या हल्ल्याच्या कटाचा उगम असावा, असा तर्क आहे. अशांत जॉर्जिया आणि चेचन्याला खेटून असलेल्या या प्रांतात त्याने प्रवास केला होता. हे दोघे भाऊ चेचेन्याचे होते आणि तेथे इस्लामी दहशतवाद्यांच्या उग्र कारवायांनी मोठाच रक्तपातही झाला होता. बोस्टनमध्ये २०११ मध्ये झालेल्या स्फोटानंतरही रशियाने दिलेल्या खबरीनंतर एफबीआयने सार्नाएव्ह याची चौकशी केली होती. त्याचे अल कायदाशी संबंध असल्याचा रशियन तपास अधिकाऱ्यांचा दावा होता. मात्र त्या चौकशीतून सार्नाएव्हचा अतिरेकी कारवायांशी काही संबंध असल्याचे आढळले नव्हते. त्याच्या कुटुंबियांचीही चौकशी तेव्हा केली गेली आणि त्यातूनही काही गैर हाती न लागल्यामुळे त्याला तेव्हा सोडून देण्यात आले होते.
स्वयंघोषित अतिरेकी?
दरम्यान, ‘कावाकाज सेन्टर’ या चेचेन अतिरेक्यांच्या इंटरनेट मुखपत्राने या दोघांना ‘अनोळखी अतिरेकी’ म्हटले आहे. अर्थात हे दोघे कोणत्याही अतिरेकी संघटनेचे नव्हते मात्र त्यांनी स्वतहून हा अतिरेकी मार्ग अंमलात आणल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे चेचन्याचा महिनाभराचा प्रवास करून परतलेल्या सार्नाएव्हने यूटय़ूबवर तेथील जिहादींचे अनेक व्हिडीओ टाकले होते. त्यात अब्दुल अल हमिद अल जुहानी हा अल कायदाचा चेचन्यातील एक कडवा अतिरेकी तसेच लेबनॉनचा धर्माध प्रचारक फैज महम्मद या दोघांचीही जहाल भाषणे होती. त्याने तिमुर मुकुराएव्ह या रशियन संगीतकाराची गाणीही संकेतस्थळावर टाकली होती. त्यातील एक गीत जिहादला पाठिंबा देणारे होते, असे ‘साईट’ या जिहादचा प्रचार करणाऱ्या संकेतस्थळांचा मागोवा घेणाऱ्या गुप्तचर गटाने उघड केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा