मणिपूर हिंसाचारप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला आहे. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. एवढंच नव्हे तर, याप्रकरणी नरेंद्र मोदी सरकारवर अविश्वास प्रस्तावही दाखल केला आहे. दरम्यान, आज राज्यसभेत बोलताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भलतेच चिडले. ते परमात्मा आहेत का, असा संतप्त सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.
मणिपूर प्रकरणावर कोणत्या नियमांतर्गत चर्चा झाली पाहिजे, यावर मल्लिकार्जुन खरगे बोलत होते. पियुष गोयल यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा दाखल देत ते म्हणाले की १६७ अतंर्गत चर्चा होऊ शकते. मग यात अडथळा काय आहे? १६७ अंतर्गत चर्चा होऊद्या, मोदींना येऊद्यात. त्यांच्यासमोर आम्ही आमचे मुद्दे मांडणार आहोत, असं खरगे म्हणताच सभागृहात सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. त्यावर चिडलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत ‘मोदी या सदनात आल्यास काय बिघडणार आहे? पंतप्रधान आल्याने काय होणार आहे? परमात्मा आहेत का ते? ते देव नाहीयत”, अशा संतप्त शब्दांत प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा >> No Trust Debate: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार अविश्वास प्रस्तावावर उत्तर, मणिपूरवर काय बोलणार? सगळ्या देशाचं लक्ष
मल्लिकार्जुन खरगे यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांचा आवाज वाढला. त्यामुळे राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांनी २ वाजेपर्यंत सभागृह स्थगित केले.
दरम्यान, मणिपूरप्रकरणावर १६७ अंतर्गत चर्चा करण्यास राज्यसभा सभापतींनी परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यसभेत याविषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.